सगळंच जुनं नसतं बरं सोनं !

वय जसं वाढत जातं

तसं जवळच कमी दिसत

माणसाचं वेड मन

भूतकाळात रमत

म्हणूनच सांगते बाबानो

“जुनं” ते सगळं सोन वाटत

कोण म्हणतो गेला काळ ग्रेट होता

तो तर फक्त आठवणींचा खेळ होता

फिक्स असत गुणोत्तर

नेहमी भल्या बुऱ्याचं

कौरव शंभर

पांडव पाच

असंच युगानुयुगे चालायचं

आमच्याकाळी असं नव्हतं

आमच्याकाळी तसं नव्हतं

किती दिवस हे पुराण गाणार ?

पुराणातल्या वांग्याचं भरीत

किती दिवस खाणार?

जरा गेल्या काळाचा मागोवा घेऊया

old is gold बाजूला ठेऊन

जरा “सत्य” पारखूया

हरप्पाच्या उत्खननात

लिपस्टिक जेव्हा सापडते

हजारो वर्षांपूर्वीच्या मानवाबद्दल

ती काय बर म्हणते ?

शृंगाराची ही आवड

सार्वकालिक आहे

पाच हजार वर्षांपूर्वीच्या पुरुषांची सुद्धा

“बायका वेळेवर तयार होत नाहीत”

हीच तक्रार आहे

परवा कोणी तरी म्हणाल

पूर्वीचे लोक शम्भर वर्ष जगत

नव्वदी ओलांडली तरी

पाच पाच किलोमीटर फिरत

या अशा वाक्यांकडे पाहून

मेडिकल सायन्स खुदुखुदू हसत

आकडेवारीच गणित वेगळंच काही सांगत

चाळीसच्यावर माणसं जगत नव्हती

रोगराई उपासमारीने सर्रास मरत होती

बघता बघता प्लेगची लाट यायची

आख्ख गाव होत्याच नव्हतं करून जायची

मग माणसं खूप जगत हे वाक्य कुठून आलं?

जन्म तारीख माहित नसणं

हेच कदाचित फायद्यात पडलं

पंधराव्या वर्षी लग्न व्हायची

चाळीशीत मांडीवर नातवंड खेळायची

लोकांना वाटे आता आमचं वय झालं

बघता बघता कसं म्हातारपण आलं

लोक म्हणतात पूर्वी सगळं स्वस्त होत,

रुपयाला बारा शेर दूध होत

तरी अश्वत्थामाच्या नशिबी

का असे पिठाची वाटी

शेकड्याच्या हिशेबात पगार

महिन्याच्या शेवटी जीव येई मेटाकुटी

बेसिकच्या चक्करमध्ये

लोकांची आयुष्य होरपळत होती

रस्त्याच्या कडेला

कुत्रीमांजरासारखी

माणसं सडत होती

उपासमारीने मरत होती

रांगा लावण्यात लोकांची जिंदगी सरत होती

रेशनसाठी रांग

दुधासाठी रांग

घड्याळासाठी रांग

गॅससाठी रांग

रेडिओसाठी रांग

फोनसाठो रांग

zomato, amazon च्या जमान्यात

खूप सोपं आहे

मागे वळून बघणं

पण खरंच होत का सोपं

तेव्हाच जगणं?

खरंच असेल निघत

भारतातून सोन्याचा धूर

पण दलितांची आणि बायकांची स्थिती

किती बरं करुण?

दलितांच्या गळ्यात थुंकण्यासाठी वाडगा होता

बायकांच्या नशिबात चूल मूल

आणि घरातला अंधार होता

मान्य ! एकदम मान्य!

आताची पोर भानगडी करतात

extra  marital अफेअर्स होतात

छोट्या छोट्या कारणांनी घटस्फोट होतात

लोकांना माणुसकीची चाड नाही राहिली

संस्कृती बिंस्कृती ढासळून

थैमान घालतोय कलियुगातील कली

पण ;

खरं सांगा काका

वाटतो ना कधीतरी

या पिढीचा हेवा?

मिळायला हवी होती तुम्हालाही

थोडीशी मुक्त हवा

एकत्र कुटुंबात जगताना कदाचित

तुम्ही मन मारलं असेल

घरात सर्वात मोठे म्हणून

समजूतदारीने सगळं निभावलं असेल

कॉलेजात शिकताना तुम्हीही केलं असेल मनापासून प्रेम

पण मग जात वेगळी म्हणून

तिच्या नावामागे लागलं नाही तुमचं name

खरं सांगा काकू

जेव्हा तुमच्या ह्यांनी

तुमच्यावर पहिल्यांदा हात उचलला होता

तेव्हा तुम्हाला किती किती राग आला होता?

वाटलं नव्हतं का

कि ह्यांना सोडून जावं

नको हे जीवन

नको हे असहाय जगणं ?

करत असते नोकरी तर गेले असते निघून

काही वेळ मोकळी हवा

घेतली असती उरात भरून

आताच सगळं चांगलं

तेव्हाच सगळं वाईट

असं मुळीच नाही बरं

सगळे गैरसमज दूर करुन

पारखून घ्यावं खरं

धोतरातून जीन्समध्ये येऊनसुद्धा

माणसं वागतात हो बरी

कामावर जाऊनसुद्धा

कुंकू न लावूनसुद्धा

one piece घालूनसुद्धा

आईच्या दुधात भेसळ नाही अजूनतरी

चांगली वाईट माणसं सगळ्या जमान्यात होती

प्रत्येक काळाचे प्रश्न वेगळे

त्यांची उत्तर वेगळी

माणुसकीवरचा विश्वास राहू दे उदंड

माणसाने गाठावी नवी शिखरे प्रचंड

-मधुराणी साळुंके

1 Comment

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.