एक अतिगोड गोष्ट

सकाळी मी घाई घाईने ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होते. आईने मला डबा दिला आणि म्हणाली, “बाबानी तुला फोन करायला सांगितलं आहे.” बाबा आधीच ऑफिसला निघून गेले होते. मी विचारात पडले. बाबांचं काय काम असेल माझ्याकडे?
मी ऑफिसमध्ये पोचता पोचता बाबांना कॉल केला.
“हॅलो बाबा, आईने मला तुम्हाला कॉल करायला सांगितलं होता. काही काम होतं का?”
“काही नाही अगं, फक्त एवढंच विचारायचं होतं कि तू घर सोडून कुठे दुसरीकडे राहायला गेलीयस का?
“काय?!!!”
“चार दिवस झाले. तुझा पत्ता नाही. सकाळी मी उठतो तेव्हा तू तुझ्या खोलीत दार लावून झोपलेली असतेस.आणि संध्याकाळी तू घरी येतेस तेव्हा मी झोपी गेलेला असतो. तुझी आता अपॉइंटमेंट घेऊन भेटायची वेळ आलीय. “
“हाहाहा!” माझा हसण्याचा दुबळा प्रयत्न. “काय हो बाबा! तुम्हीपण ना! मला आजकाल ऑफिस मध्ये जास्त काम असत.म्हणून मग आल्या आल्या झोप येते.”
“तुम्ही मुलं ना, पेइंग गेस्ट होऊन बसला आहेत. काम तर आयुष्यभर असणारच आहे. पण घरी आल्यानंतर जरा आईबापांशी चार शब्द बोलत जा जरा. “
“हो बाबा.आज संध्याकाळी जाऊ नेहमी प्रमाणे जेवण झाल्यावर फिरायला.”
“ठीक आहे. चल मग.ठेवतो आता फोन.बाय”
“बाय”
मी फोन ठेवला आणि अचानक माझ्या चेहऱ्यावर खूप मोठं हसू उमटलं. या जगात माझ्याशी न बोलणं झाल्यामुळे चक्क कुणाला तरी फरक पडतो. असं वाटलं कि मला कोणीतरी उबदार पांघरुणात गुंडाळून मऊ मऊ बेड वर ठेवलंय. AC चालू आहे, सकाळचं कोवळं ऊन पडद्यातून झिरपून आत येत आहे आणि माझ्या हातात मोठ्ठा कॉफीचा वाफाळता मग आहे.मस्त cozy cozy वाटलं मला. त्या गोड फीलिंगने मला एकदम वेढूनच घेतलं.
आपण किती गृहीत धरतो ना आईबाबांना.आपल्या मित्रमैत्रिणींशी भांडण झालं किंवा बॉयफ्रेंडने भांडण केलं तर आपण किती अस्वस्थ होऊन जातो. आपलं या जगात कुणीच नाही असं वाटायला लागत. पण आपली सगळी दुखणीखुपणी, आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ऐकण्यात खरा रस असतो तो आई बाबांना. लहानपणी शाळेतून येऊन प्रत्येक गोष्ट सांगायची असायची मला माझ्या बाबांना. मोठं होता होता सिक्रेट्स वाढत गेले. शेअरिंग कमी कमी होतं गेलं. माझी माणसं माझ्या आजूबाजूला असूनही मी स्वतःच स्वतःला एकटं पाडून घेतलं.
पण बाबांचा असा थोडा काळजीचा आणि माझी थोडीशी मस्करी उडवणारा फोन आला आणि मला वाटलं, किती नशीबवान आहे मी. आता मला कदाचित कधीच एकटं वाटणार नाही. कारण मला माहितीय, या माणसांनी भरलेल्या जगात असं एक माणूस तरी नक्कीच आहे, ज्याला माझ्याशी बोलण्याचा कधीच कंटाळा येणार नाही. एका मोठं हसू चेहऱ्यावर मिरवीत मी दिवसाची सुरवात केली.
आणि विश्वास ठेवा अगर नका ठेवू,
खरंच त्या दिवशी माझे पाय जमिनीवर पडले नाहीत…