प्रेमभंगातून कसे सावरावे?

Ours is the generation of broken hearts.

कधीतरी कुठेतरी प्रत्येकाचा जीव जडला असणार. जीव जडून हुरहुरून प्रत्येकजण कधीतरी आपल्याच तंद्रीत नक्की फिरला असणार. पण सर्वच गोष्टी आपल्याला हव्या तशा थोड्याच होतात? आणि मग गोष्टी आपल्याला हव्या तशा घडत नाहीत तेव्हा त्यातून सावरायचं कसं? या वढाय वढाय मनाला आवरायचं कसं?

कठीण आहे. पण शक्य आहे.खरंच!

ह्या गोष्टीला वेळ लागणार. पण तुम्ही नक्कीच त्या घटनेमुळे होणार त्रास हळू हळू कमी करू शकता. जस शारीरिक जखम बरी व्हायला वेळ लागतो तसाच वेळ मानसिक जखम भरून यायलाही लागतो हे लक्षात ठेवा. पण ती बरी होऊ शकते. व्रण राहतील. पण वेदना नक्कीच कालानुरूप गायब होतील.

पहिल्यांदा एक लक्षात घ्या कि ती व्यक्ती परत तुमच्या आयुष्यात येणार नाहीय.

आपण खूप आशा लावून बसतो आणि विचार करतो कि ती व्यक्ती कधीतरी परत आयुष्यात येईल. असं फक्त चित्रपटात होत. खऱ्या आयुष्यात होत नाही. आणि शेवटी ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून का गेली किंवा त्या व्यक्तीने तुम्हाला नकार का दिला याच काहीतरी कारण असेलच ना? कदाचित तुमची भेट अजून चांगल्या व्यक्तीशी होणार असेल. तुम्ही अजून चांगल्या व्यक्तीसोबत राहणं डिझर्व करता. समजा त्या व्यक्तीने तुम्हाला नकार दिला आहे आणि काही दिवसांनी ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत आली तर कदाचित ती व्यक्ती फक्त तुमचा एक ऑपशन म्हणून वापर करत असेल (स्वतःच्याही नकळत) किंवा कदाचित ती व्यक्ती दुसर्याकडून हर्ट झाली म्हणून त्या व्यक्तीला तुमची किंमत कळलेली असेल, पण तुम्हाला कोणाचा तरी सेकंड चॉईस व्हायचंय का? शिवाय कदाचित तुमच्या जखमा तोवर भरलेल्या असतील, तुम्हाला त्या खपल्या परत काढायच्या आहेत का? कदाचित तेव्हा तुमच्या आयुष्यात अजून बेटर व्यक्ती असेल. समजा जर तुमचं ब्रेक अप झालाय, मग तर परत जायचा विचारच करू नका. आपल्या एक्स सोबत परत रिलेशनशिप सुरु करणं म्हणजे तुमचं आवडत पुस्तक परत परत वाचण्यासारखं आहे, जरी पुस्तक तुम्हाला कितीही आवडलं तरी त्याचा शेवट तुम्हाला माहित असतो. म्हणून आशा सोडून द्या आणि निर्धार करा कि यातून तुम्ही बाहेर पडणार आहेत.आयुष्य खूप सुंदर आहे आणि तुमच्या आयुष्यात तुमच्याहून महत्त्वाचं कोणीच नाही. हि आयुष्यात पुढे जाण्याची पहिली पायरी आहे.

खूप रडून घ्या.

मन मोकळं करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून हवं असेल तर रडून घ्या. पण एका मर्यादेनंतर स्वतःला सांगा कि आता बस. आता त्याच व्यक्तीसाठी परत रडणार नाही. आणि तो निर्धार पाळा

व्यायाम करायला सुरवात करा.

व्यायाम केल्यामुळे शरीरात डोपामाईन रिलीज होत ज्यामुळे तुम्ही आनंदी बनता. धावणारा माणूस रडू शकत नाही. नाचणारा माणूस रडू शकत नाही. आणि तुम्हाला स्वतः बद्दल चांगलं वाटण्यासाठी व्यायाम मदत करतो

कॉमेडी सिरीयल बघा.

तुम्हाला जेव्हा खूप वाईट वाटत असेल तेव्हा तुमचे आवडते विनोदी चित्रपट किंवा सिरिअल्स बघा. स्वतःला दुःख देणार नाही असा निर्धार करून वागा. पुलंची निवडक पुलं हि कॅसेट ऐका. असा मी असामी ऐका. Friends serial बघा.

चांगली पुस्तक वाचायला सुरवात करा.

ज्ञानग्रहणासाठीच वाचलं पाहिजे असं काही नाही. तुम्हाला आनंद देणार काहीही वाचा. मग ते फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे पासून शिवा ट्रिलॉजि पर्यंत किंवा बोलगाणी पासून ययातीपर्यंत काहीही असू शकत.

जमेल तेवढी मदत घ्या. घरच्यांची. मित्रमैत्रिणींची.

स्वतःला माणसांच्या गराड्यात ठेवा. काही दिवस तरी. मित्रमैत्रिणींसोबत ट्रेक ला जा. फिरायला जा. शॉपिंग करा. थोडक्यात म्हणजे जे जे करून तुम्हाला आनंद होतो त्या त्या गोष्टी करा. स्वतःला व्यस्त ठेवा आणि स्वतःकडे लक्ष द्या.

व्यसनांपासून लांब राहा. मनाच्या नाजूक अवस्थेत तुम्ही व्यसनाधीन होण्याची शक्यता खूप जास्त असते.

त्या व्यक्तीचे चांगले गुण थोड्याकाळासाठी विसरून जा.

ती व्यक्ती चांगली होती म्हणूनच तर ती तुम्हाला आवडली. पण जो पर्यंत तुम्ही या सगळ्यातून बाहेर येत नाही तोवर त्या व्यक्तीचे सर्व दोष एका कागदावर लिहून काढा. तुमचं का जमलं नाही याची कारणं लिहून काढा, आणि जेव्हा त्या व्यक्तीची अनावर आठवण येईल तेव्हा तो कागद वाचा.

कोणत्याही रिलेशनशिप मध्ये जाण्याची घाई करू नका.

तुम्ही जेव्हा दुःखात असता तेव्हा घेतलेले निर्णय बहुधा चुकीचे असतात. तुम्ही या अवस्थेत चुकीचे निर्णय घेऊ शकता. मुख्यतः लग्नासारख्या निर्णय तर अजिबात नको. तुम्ही स्वतःवर आणि समोरच्या व्यक्तीवर अन्याय करण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही डेटवर जाऊ शकता, वेगवेगळ्या लोकांना भेटू शकता. चांगला वेळ घालवू शकता. पण काही काळासाठी तरी कमिटमेंटपासून आणि रिलेशनशिपपासून दूर राहा. मग रिलेशनशिपमध्ये कधी जावं? जेव्हा त्या व्यक्तीची सकाळी उठल्या उठल्या आठवण येणं बंद होईल, जेव्हा दोन तीन तास सलग त्या व्यक्तीच्या आठवणींशिवाय जाऊ लागतील, तेव्हा तुम्ही नवीन नात्यासाठी तयार असाल.

तुमच्या आयुष्याची ध्येय ठरवा, त्यासाठी प्लॅन करा.

जाणीवपूर्वक त्या व्यक्तीचा विचार तुम्हाला वेगळ्या विचाराने रिप्लेस करायचा आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला जाणवलं, कि तुम्ही त्या व्यक्ती बाबतच्या विचारात गुंतत चालला आहेत तेव्हा एक वाक्य स्वतःसाठी बनवून ठेवायचं. नामस्मरणासारखं. (“मी येत्या दोन महिन्यात नवीन जॉब मिळवणार आहे.” तत्सम)आणि ते वाक्य स्वतःशी तोपर्यंत म्हणायचं जोपर्यंत त्या व्यक्तीचा विचार मनातून जात नाही. हळू हळू तुमच्या मेंदूला ती सवय लागेल आणि शिवाय तुम्ही स्वतःच्या प्रगतीवरही लक्ष केंद्रित करू शकाल.

आता याक्षणी तुम्हाला सगळं खूप अवघड वाटत असेल. पण काळाचं मलम सर्व जखमांवर लागू पडत. तुम्ही आयुष्यात परत खळखळून हसू शकाल. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वाटणारा आनंद नक्की परत येईल. धीर धरा आणि प्रयत्न करत राहा. खूप शुभेच्छा.