पुन्हा घडते आहे तेच जरा नको नकोसे; जरा हवे हवेसे!
तसेच शब्द गुलाबी
तशीच धुंदी शराबी
अस्वस्थ चाहूल तीच
कातर मन जरासे;
पुन्हा घडते आहे तेच जरा नको नकोसे; जरा हवे हवेसे!
थांबावी मन पुन्हा
करू नकोस हा गुन्हा
हा मार्ग आहे तोच;
जिथे काळीज चिरले जरासे!
पुन्हा घडते आहे तेच जरा नको नकोसे; जरा हवे हवेसे!
जरा त्याच्या मिठीत जाता
काळ थांबे घेऊन उसासा
मेलो आहोत कितीदा;
जगून घेऊ आता जरासे!

-मधुराणी