किनारा…

संध्याकाळची वेळ मोठी हुरहूर लावणारी असते. सायंकाळ होता होता एकटेपणा मनाला नकळतच घेरू लागतो. दिवस संपणार म्हणून मन जरासं हुरहूरु लागत. त्या संध्याकाळचं वर्णन कवी विद्याधर सीताराम करंदीकर या कवितेत करत आहेत. सुंदर पण उदास संध्याकाळ. आणि सर्व काही असूनही मनाला घेरणारी एकाकी कवी किनारा आणि समुद्राच्या वर्णनातून दर्शवू पाहतो.

घननीळ सागराचा घननाद येत कानी

घुमती दिशादिशात लहरींमधील गाणी

निळ्याशार अथांग सागराची अविरत गाज कानी ऐकू येत आहे. त्याच्या लाटा अवखळ खेळ खेळत आहेत. त्यांचा नाद सर्व वातावरणात भरून राहिला आहे.

चौफेर सूर्याज्वाला वारा अबोल शांत

कोठे समुद्रपक्षी गगनी फिरे निवांत

सगळीकडे लालभडक अशा मावळतीच्या सूर्याची किरणे विखुरली आहेत. पाण्यात पडलेल्या त्याच्या प्रतिबिंबामुळे सर्वत्र एक लालिमा भरून राहिला आहे. वाराही तसा शांतशांतच आहे. कुठेतरी दूर एखादा समुद्रपक्षी घिरट्या घालत आहे.

आकाश तेजोभारे माडांवरी स्थिरावे

भटकी चुकार होडी लाडात संथ वाहे

आकाशाला या तेजाचं वजन झालं कि काय? माडांवर हात टाकून ते असं टेकून का उभं आहे? दुर कुठेतरी एकुलती एक होडी पाण्यावर हळूहळू डुचमळते आहे.

वाळूत स्तब्ध झाला रेखाकृती किनारा

जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा

किनाऱ्यावर सततच्या लाटांनी आणि काही खेकड्यानी काढलेल्या रांगोळ्या उमटल्या आहेत. कदाचित हि ओहोटीची वेळ आहे. किनाऱ्याला लागली आहे तहान समुद्राची. त्याच उघड पडलेलं हे शरीर समुद्राने पुन्हा झाकून टाकावं. या रांगोळ्या मिरवण्याची त्याची अजिबात इच्छा नाही. पण समुद्र जवळ असूनही किनारा अतृप्तच आहे. युगानुयुगे. आणि हे असच चालणार. युगानुयुगे.

जलधि बरोबरीचे आभासमान नाते

त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे

समुद्रासोबत किनाऱ्याचा नातं म्हटलं तर आहे म्हटलं तर नाही. त्याच समुद्रवाचून काही वेगळं अस्तित्वच नाही. काहीवेळ येऊन समुद्र त्याच्याशी लडिवाळपण करून जातो खरा. पण तेवढ्यापुरतच असत ते. त्यांचं नातं किती खर आहे ते किनाऱ्याला नाही माहित.

सानिध्य सागराचे आकाश पांघराया

परी साथ ना कुणाची अस्तित्व सावराया

म्हणायला गेल तर सगळं आहे. समुद्रासारखा समर्थ सखा आहे. आकाश आहे पांघरायला. पण जेव्हा असा एकटेपणा मन वेढून घेतो तेव्हा सोबत करायला मात्र कोणीच नाही. किनारा अगदी एकटा आहे.

कधीकधी आपण अशा नात्यांमध्ये अडकून पडतो जिथून ना मागे येता येतं. ना पुढे जाता येतं. लोकांनी आपल्या सौख्याचा हेवा करावा अस स्वर्गवैभव पायाशी लोळण घेत असत. पण तरीही मनात काहीतरी ठुसठुसत असत. सगळं आपलं असूनही त्यावर आपला खरा अधिकार नाही हि भावना मन कातरत असते. मग असलेल्या दिखाऊ सौख्याबद्दल मन एकदम उदासीन होऊन जात. ते एकलेपण सरता सरत नाही.आपण एकटे असतो तेव्हा एकटेच असतो. पण आपण जर कोणासोबत असूनही एकटे पडलो असू तर त्यापरत दुःख नाही. अशावेळी आहे ती वस्तुस्थिती जशी आहे तशी स्वीकारण्याखेरीज पर्याय नसतो.

अशा नात्याचं वर्णन कवी कवितेत करतो आहे.

अशी वेळ कधीच कोणावर येऊ नये. पण समजा दुर्दैवाने असं झालच तर आपला आनंद आपण स्वतःच्या आत शोधावा. कारण ती दुसरी व्यक्ती येण्याआधी सुद्धा आपण आनंदी होतोच ना? मग तो परत का सापडू नये? तो आनंदाचा ठेवा आपल्या आताच आहे. फक्त तो शोधण्याची गरज आहे.