कोऽहं ?

कोऽहं ? मी कोण? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचं आहे. ‘मी कोण’चा शोध आयुष्यभर सुरूच असतो.

प्रभू श्रीराम लहान असताना गुरु वसिष्ठांच्या आश्रमात शिकायला होते. एकदा काही दिवसांसाठी ते परत आपल्या आईबाबांना भेटायला म्हणून स्वगृही गेले. परतत असताना रात्र झाली. खूप उशीर झाला. आश्रम जवळ पोचल्यावर श्रीरामांनी आश्रमाच्या दारावर टकटक केली. वसिष्ठांनी आतून विचारलं, “कोण आहे?” तेव्हा राम म्हणाले, “तेच तर शिकायला तुमच्याकडे आलोय गुरुजी”

“मी कोण” या प्रश्नच उत्तर शोधायला गुरुची गरज असते. तो गुरु तुम्हाला मिळाला तर उत्तमच. पण जर नाही मिळाला तरी “तुम्ही त्या क्षणी कोण आहेत” याच संपूर्ण जरी नसलं तरी इतरांपेक्षा काकणभर अधिक ज्ञान तुम्हाला असायलाच हवं. आणि स्वतःला ओळखणं म्हणजे स्वतःची बलस्थान आणि स्वतःच्या कमजोर जागा माहित असणं. आपल्याला आपल्यातले चांगले गुणच प्रकर्षाने दिसतात. आणि वाईट गुण सहसा दिसत नाहीत.म्हणून मनाचा आरास स्वच्छ ठेवायला हवा म्हणजे आपण जसे आहोत तसे आपले प्रतिबिंब त्यात लख्ख दिसेल.

“मी कोण” याचा शोध अतिशय अवघड आहे. तो आयुष्यभर सुरूच राहणार. आणि आपण स्वतःला जे म्हणतो किंवा मानतो ते देखील कालसापेक्ष असत, लहानपणी आपल्याला अतिशय आवडणारी मालिका कदाचित आपल्याला आज आवडत नसेल. एखादी अतिशय नावडती भाजी नंतर कधीतरी अगदी आवडून जाते. कदाचित आपण आधी खूप रागीट स्वभावाचे असू पण कालांतराने राग नियंत्रणात ठेवायला शिकतो. कदाचित आधी आपण खूप निरागस असू पण कालांतराने जगाचे रंग आपल्याला ओळखता येऊ लागतात.

गौतम बुद्ध म्हणाले होते, “तुम्ही एका व्यक्तीला फक्त एकदाच भेटता. तुम्ही परत भेट पर्यंत त्या व्यक्तीमध्ये काही ना काही बदल झालेला असतो. तो बदल कितीही सूक्ष्म असो, पण ती व्यक्ती तेवढ्याने बदलेली असते.” म्हणूनच “स्व-ची व्याख्या” सतत बदलत असते.

आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवतो की त्यांनी आपल्याला समजून घ्यावं, पण खरंतर आपणच स्वतःला किती ओळखतो? एखाद्या क्षणी आपली एखाद्या गोष्टीवर नक्की प्रतिक्रिया काय असेल ते १००% अचूकतेने आपण आधी नाही सांगू शकत. मग दुसऱ्यांकडून अशी अपेक्षा कशी बरं ठेवता येईल.

तुमच्यातला तुमचा आतला खरा स्वर तुम्हाला सापडावा आणि तो स्वर ऐकण्याचं सामर्थ्य तुम्हाला लाभो हीच शुभेच्छा.