मी फुल तृणातील इवले…

जरी तुझिया सामर्थ्याने

ढळतील दिशाही दाही

मी फुल तृणातील इवले

उमलणार तरीही नाही.

एक लहानस गवतफुल,आव्हान देतय सूर्याला. ते म्हणतय, मान्य आहे कि तू सर्वशक्तिमान आहेस. तुझ्या सामर्थ्याने सार जग हादरवण्याची शक्ती तुझ्यात आहे. पण तुला सांगून ठेवतो, ऐक; मी कधीही तुला घाबरून उमलणार नाही.

शक्तीने तुझिया दिपुनी

तुज करतील सारे मुजरे

पण सांग कसे उमलावे

ओठातील गाणे हसरे

तुझ्या शक्तीने दिपून जाऊन सर्व जण तुझ्यासमोर नम्र होतील, लाचारीने वागतील. पण त्यात खरेपणा नसेल. त्यांचं हसू खर नसेल. शक्तीने आणि सामर्थ्याने तुम्ही लोकांना वाकवू शकता, पण हसवू शकत नाही.

जिंकली मला दवबिंदू

जिंकली तृणाचे पाते

अन स्वतःस विसरून वारा

जोडील रेशमी नाते

हे इवलंसं दवबिंदू बघ, त्याच्यात माझं मन जिंकण्याचा सामर्थ्य आहे. वाऱ्यावर डोलणाऱ्या तृणपात माझ्या मनावर अधिराज्य करू शकत. मला छेडणारा हा अवखळ वारा माझ्याशी जन्मजन्मांतरीच नातं जोडू शकतो. त्यांची शक्ती कुठे आहे असं तुला वाटत? त्यांच्या सामर्थ्यामध्ये? अंहं! त्यांच्या मनातील प्रेमामध्ये!

कुरवाळीत येतील मजला

श्रावणातल्या जलधारा

सळसळून भिजली पाने

मज करतील सजल इशारा

श्रावणातल्या अल्लड जलधारा माझे लाड करतील. सळसळणारी भिजलेली पाने माझ्याकडे प्रीती कटाक्ष टाकतील. आणि माझं मन मोहून घेतील. त्यांच्या प्रेमामध्ये जे सामर्थ्य आहे ते तुझ्याशक्ती मध्ये नाही.

रे तुझिया सामर्थ्याने

मी कसे मला विसरावे

अन रंगांचे गंधांचे

मी गीत कसे गुंफावे

अरे तू कितीही महान असलास तरी मी माझं स्वत्व कस विसरू? तू कितीही मोठा असलास तरी मी मला कसं विसरू? मला मिळालेल्या रंगांच्या आणि गंधांच्या वरदानच सार्थक करायला मला हवय नातं ते मनाच. प्रेमाचं!

शोधीत धुक्यातून मजला

दवबिंदू होऊनि ये तू

कधी भिजलेल्या मातीचा

मृदू सजल सुगंधित हेतू

मला खरंच तुला जिंकायचं असेल ना, तर तू पहाटेच्या मऊ धुक्यात मला शोधात दवबिंदूच रूप घेऊन ये. कधी भिजलेल्या मातीचा तो उन्मादक सुवास घेऊन ये.

तू तुलाच विसरून यावे

मी तुझ्यात मज विसरावे

तू हसत मला फुलवावे

मी नकळत आणि फुलावे

मला जिंकायचं असेल ना, तर तुला स्वतःला विसरावं लागेल. थोडंसं तुझं मी पण माझ्यात मिसळावं लागेल, तेव्हाच तर होईन मी तुझा; तुझ्यामध्ये मीही स्वतःला विसरून जाईन. तुझ्या रंगात रंगून जाईन. आणि मला कळणारच नाही कि मी कधी तुझा झालो. मी कधी तुझ्यासाठी फुललो.

हि कविता आपल्याला प्रेमाचं सामर्थ्य दाखवते. निरपेक्षपणे केलेल्या, स्वतःला विसरून केलेल्या प्रेमात प्रचंड ताकद असते. पैसा आणि शारीरिक सामर्थ्य यांच्या बळावर तुम्ही माणसांची मन नाही जिंकू शकत. त्यांच्या चेहऱ्यावर हसू नाही फुलवू शकत. तुम्ही जेव्हा समोरच्याच्या मनाचा विचार करता, त्याच्या भावभावना समजून घेता आणि त्यांना स्वतःचे निर्णय घेऊ देता तेव्हा तुम्ही त्यांचं मन जिंकता.

उदाहरणच द्यायचं झालं, तर शिवाजी महाराजांना काय कमी होत? घरची जहागीर होती, उच्चकुळातला जन्म होता. ते आपल्या हाताखालच्या लोकांना लढाईसाठी पाठवू शकत होते. पण मग ते लोकनायक कधीच झाले नसते. त्यांनी आपल्या साथीदारांवर भावासारख प्रेम केलं. त्यांच्या मनात “स्व”राज्यच स्वप्न फुलवलं. त्यांनी स्वराज्याच स्वप्न लादलं नाही त्यांनी आपल्या लोकांवर. शिवाजी महाराजांचं जेवढं स्वराज्यावर प्रेम होत तितकाच त्या लोकांचही स्वराज्यावर प्रेम होत. म्हणूनच राजा गेला तरी त्याच्या माघारी पंचवीस वर्ष जनता ते स्वप्न टिकवायला लढत राहिली.

हे तर खूपच मोठं उदाहरण झालं. पण आपल्या जवळच्या माणसांनासुद्धा आपण कितीदा तरी नकळत दुखावत असतो, त्यांच्यावर आपले विचार लादत असतो. पण जर त्यांचं मन जिंकायचं असेल तर प्रेमाचाच रस्ता उपयोगी पडेल. धाकाचा नाही. मग पैशाचा धाक असो; शारीरिक सामर्थ्याचा धाक असो वा सोडून जाण्याचा धाक असो. खर प्रेम हे तुम्हाला स्वातंत्र्य देत आणि त्याच बरोबर आपलया माणसांशी बांधूनही ठेवत.