सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना
तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना
सर्वात्मक आणि शिवसुंदर, प्रभूचं याहून सुंदर वर्णन काय असू शकेल? तिमिराकडून तेजाकडे आमच्या जीवनाला ने याहून अधिक चांगलं मागणी देवाकडे काय असू शकेल ?
सुमनांत तू, गगनात तू
ताऱ्यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये
सर्वात त्या वसतोस तू
चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना
तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना
हे तारे, ही फुलं; नव्हे जे जे जीवनात मंगल आहे, उदात्त आहे, थक्क करून टाकणारं आहे, मनाला भिडणारं आहे, त्या त्या सर्वात प्रभूचाच वास आहे. त्याची रूपे सगळीकडे आहेत. ब्रह्म संकल्पना याहून वेगळी काय असू शकेल?
श्रमतोस तू शेतामध्ये
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले व गांजले
पुसतोस त्यांची आसवे
स्वार्थावीना सेवा जिथे तेथे तुझे पद पावना
तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना
शेतात राबणारे कष्टकरी, श्रमिक यांच्यात कवीला देव दिसतो. अवघ्या अभाग्यांचे अश्रू पुसायचे व्रत घेणारी काही देवतुल्य माणसे आहेत, त्यांच्या कार्यात कवीला देव दिसतो. स्वार्थावीना सेवा जिथे असेल तेथे तो सर्वात्मक परमेश्वर असेलच असेल.
न्यायार्थ जे लढती रणी
तलवार तू त्यांच्या करी
ध्येयार्थ जे तमी चालती
तू दीप त्यांच्या अंतरी
ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्या तू साधना
तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना
समर्थांची तलवार असमर्थ आणि दीनदुबळ्यांच्या संरक्षणासाठी जेव्हा उचलली जाते तेव्हा त्यांच्या तलवारीत कवीला देव दिसला तर त्यात नवल ते काय? एकाच ध्येयाचा ध्यास घेऊन अनिश्चित अशी वाटचाल करणाऱ्या ध्येयवेड्यांच्या मनातील आशा म्हणजे देवच नाही का? अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी ज्ञानाचा वसा घेणारे शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, संशोधक यांची साधना म्हणजेच देव आहे. ती साधनाच मानवजातीला तिमिराकडून तेजाकडे नेणार आहे
करुणाकरा करुणा तुझी
असता मला भय कोठले
मार्गावर पुढती सदा
पाहीन मी तव पाऊले
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना
तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना
खरंच, त्या शिवसुंदर करूणाकाराची कृपा असेल तर आयुष्याचा प्रवास करायचा धीर शतपटीने वाढेल. त्या विश्वविधात्याच्या मार्गदर्शनाखाली हा तिमिराकडून तेजाकडे जाणारा प्रवास अधिक सोपा आणि रम्य होईल. कवी शेवटची मागणी देवाकडे करतो , की माझ्या मनात नित्य नव्या कल्पना येवोत, नवीन विचारांना जन्म लाभो आणि माझे विचार बोलून दाखवण्याची किंवा उक्तीला कृतीत रूपांतरित करण्याचे बळ मला लाभो.
कुसुमाग्रजांची ही कविता माझी अत्यंत आवडती आहे. देवाकडे याहून समर्पक असे मागणे असूच शकत नाही.
