“हे माझ्यास्तव…हे माझ्यास्तव…”

कृष्णाच्या जादूमय व्यक्तित्वाने साऱ्या कवींना नेहमीच मोहिनी घातली आहे. राधाकृष्णाच्या प्रेमकथांनी तर अनेक कवींना आणि चित्रकारांना विषय पुरवले. पण कवयित्री इंदिरा संतांची एक कविता मला नेहमी भुरळ घालते. कुब्जा आणि कृष्णाची कथा.

कमरेला पोक आलेल्या कुब्जेला सर्व जगाने हिणवलं. तिचा तिरस्कार केला. तिचा स्वच्छ मन कुणी पाहिलं नाही कि कृष्णावरची तिची अपरंपार श्रद्धा आणि भक्ती कुणी ओळखली नाही. ओळखली ती फक्त एका कृष्णाने. कृष्णाच्या एका हस्तस्पर्शाने कुब्जेचे कुबड गेले. पण तिला प्रत्यक्ष भेटण्याआधी कृष्णाने तिला धीर कसा दिला त्याची ही सुरेख कहाणी इंदिरा संतांना कोणत्यातरी क्षणी कवितेत बद्ध करावीशी वाटली असेल.

अजून जागी नाही राधा

अजून जागी नाही गोकुळ

अशा यावेळी पैलतीरावर

आज घुमे का पावा मंजुळ ?

राधाही जागी नाही. गोकुळही शांत झोपलेलं आहे. अशावेळी हे बासरीचे मंजुळ स्वर पैलतीरावरून यमुनेच्या पाण्यावरून तरंगत येत आहेत. कोण अशा अवेळी कोण कशासाठी हे शांत शांत करणारे संगीतराधन करत आहे?

मावळतीवर चंद्र केशरी

पहाटवारा भवती भणभण

अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती

तिथेच टाकून आपुले तनमन

बासरीच्या स्वरांनी आपले तनमन ती विसरलीय. मावळतीवर चंद्र आहे. वारा भणाणतोय. पण त्याच भान तिला नाही. त्या स्वरांच्या ओढीने ती चक्क पाण्यात जाऊन उभी राहिलीय. मुग्ध होऊन ती त्या दैवी स्वरांचा अनुभव घेतेय.

विश्वाची अवघे ओठ लावून

कुब्जा प्याली तो मुरलीरव

डोळ्यांमधले थेंब सुखाचे

“हे माझ्यास्तव…हे माझ्यास्तव…”

हे पाण्यावर तरंगत मनाला शांत शांत करणारे स्वर साधे नक्कीच नाहीत. हे नक्कीच माझ्या कृष्ण परमात्म्याच्या बासरीतून उमटले आहेत. तो आलाय. मला धीर द्यायला. मला त्याच्या स्वरांतून सांगतोय. मी आहे. घाबरू नकोस. धीर धर. मी लवकरच येईन तुझ्या भेटीला . एवढा जगाचा पालनकर्ता. विश्वाचा विश्वेश्वर. पण माझ्या बापडीची रात्री सोबत करतोय. त्या सुरांच्या वर्षावात ती न्हाऊनमाखून निघाली. सर्व विश्वाची रसप्राप्ती झाली तिला. कुब्जेला. अति आनंदाने तिच्या गालांवर आत्मरस पाझरू लागला. राधेसारखं प्रत्येक दिवशी त्याला भेटण्याचं, पाहण्याचं, त्याचा पावा ऐकण्याचं भाग्य तिला मिळालं नसेल कदाचित. पण तिला मिळालेल्या या एका रात्रीमध्ये तिला आयुष्यभराचा आनंद मिळाला. कारण ही परमात्म्याची रात्र फक्त तिच्यासाठी होती. फक्त तिच्यासाठी होती.