Not-So-Happy Birthday

मी सातवीत असतानाची गोष्ट आहे.

मी माझ्या वाढदिवसाला खूप लोकांसोबत होते पण खूप एकटी होते.

माझा वाढदिवस बऱ्याच वेळा दिवाळीत येतो. ८ नोव्हेंबर. (पुलंचा आणि माझा वाढदिवस सेम आहे बरं का)

दिवाळीची सुट्टी सुरु झाली कि मी आई आणि माझा भाऊ नेहमी आजोळी जायचो. आणि बाबा मात्र मुंबई मधेच थांबत. त्यांना कामावरून सुट्टी मिळत नसे. आणि गावी माझे फारसे मित्र मैत्रिणी नव्हते. वाढदिवस साजरा करणं हि फारशी रूढ प्रथा नव्हती. मला माझा लहानपणी साजरा झालेला एकच वाढदिवस आठतोय. पेढ्याचा केक आणलेला आजोबानी.

या पार्श्वभूमीवर सातवीचा वाढदिवस माझ्यासाठी खूप विशेष होता. करणं मी पहिल्यांदाच दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी जाणार नव्हते. माझे सुट्टीतसुद्धा सातवी स्कॉलरशिपचे वर्ग होते. म्हणून पहिल्यांदाच माझा वाढदिवस मी बाबांसोबत साजरा करणार होते. पण तसं झालं नाही. माझ्या बाबाना एका लहान मुलांसाठीच्या मिलिटरी कॅम्प बद्दल माहिती कळली. आधी मला वाटलं कि फक्त माझ्या भावाला या कॅम्पला पाठवतील. नंतर कळलं कि बाबांनी माझं आणि माझ्या भावाचं, दोघांचंही नाव नोंदवलाय. आधीच शारीरिक श्रमांचा मला तिटकारा होता. मिलिटरी कॅम्प हे ऐकूनच मी माझा नकार जाहीर केला. आणि तो तीन दिवसांचा मिलिटरी कॅम्प ७,८ आणि ९ नोव्हेम्बरला होता. मग तर मला अजिबात जायची इच्छा नव्हती. मी रडून रडून हैदोस घातला. धिंगाणा केला. मग बाबांनी मला समजावलं. “बघ वाढदिवस तर आयुष्यभर परत परत येणारच आहे. आणि तू परत आल्यावर करू कि आपण तुझा वाढदिवस. पण हा एक अनुभव आहे. माणसं अनुभवाने श्रीमंत होतात. तू नवीन लोकांना भेटशील. नवीन मित्र मैत्रिणी होतील. नवीन गोष्टी करून बघायला मिळतील.” पण मी जाम बधत नव्हते. मग बाबा चिडले. म्हणाले, “माझाच चुकलं. मला वाटलं कि तुला नवीन अनुभव घेण्यात रस असेल. एवढी पुस्तक वाचतेस तू; त्याचा काय उपयोग.इंदिरा गांधी केवढी वर्ष आई वडिलांपासून लांब राहिल्या. तुम्हा लोकांना ३ दिवस काढता येत नाहीत. आमचा कधी वाढदिवस कोणी साजरा केला नाही. इतकाच काय आम्हाला आमच्या वाढदिवसाची तारीख पण माहित नाही. म्हणून काही अडलंय का. आम्ही काय रडत बसलो का, इत्यादी इत्यादी इत्यादी.(प्रो लेवल मॅनिप्युलेशन)” आता इगो हर्ट झाला. मग म्हटलं, घरी राहून पण वाढदिवसाला बहुतेक शिव्याच पडणार आहेत. त्या पेक्षा जाऊया त्या कॅम्पला.

बिचारी मी!

तो कॅम्प नावालाच मिलिटरी कॅम्प होता. खरंतर श्रीमंत मुलांची दिवाळी सुट्टी आनंददायी करण्यासाठी तो कॅम्प एका अतिश्रीमंत शाळेने सुरु केला होता. बाबांनी खूप पैसे भरले असणार त्या कॅम्पसाठी. जेवण तर अमेझिंग होतंच. आणि त्यांनी ज्या ऍक्टिव्हिटी ठेवल्या होत्या त्या पण मस्त होत्या. घोडेस्वारी. रायफल शूटिंग. वॉल क्लाइंबिंग. नकलांचा कार्यक्रम. डान्स. स्विमिन्ग. रॅम्प वॉक. मनोरंजनाची परिपूर्ण कॅम्प होता तो. पण नकलांचा कार्यक्रम आणि स्विमिन्ग सोडलं तर मला त्यापैकी कशातही रस नव्हता.पुन्हा मी मराठी माध्यमाची. माझ्या आजूबाजूला सगळी इंग्रजी बोलणारी मुलं. त्यांची मातृभाषा इंग्रजी असल्यासारखी ती मुलं संभाषण करत. समजत सगळं होत. पण इंग्रजीत उत्तर देण्याचा ना आत्मविश्वास होता ना तेवढी शब्दसंपत्ती. मला अगदीच कानकोंडं होऊन गेल्यासारखं वाटलं. पुन्हा त्या मुलांचं आणि माझं कल्चर अजून वेगळं. पार्टी मध्ये गाणी लागल्यावर उठून बिनधास्त नाचणं हे मला कधी जमलं नाही. आणि या कॅम्प मध्ये रस्त्यात गाणी वाजायची आणि सर्व मुलं बिनधास्त नाचायला लागत. माझ्या शाळेत हे असं होताना मी कधी बघितलं नव्हतं.

म्हणजे टाळ्या वाजवल्याने ध्वनिप्रदूषण होत म्हणून हात वर करून हलवून आनंद व्यक्त करा असं शिकवणाऱ्या शाळेत मी जायचे. मग नाच वगैरे खूप लांबची गोष्ट होती.

वाढदिवसाच्या दिवशी तर हद्दच झाली. त्यांनी इंटेन्स ट्रेनिंग ठेवलेलं. त्यात जमिनीवरून सरपटण, दोरीने लोंबकाळून दुसरीकडे जाण, आगीवरून उडी मारणं इत्यादी प्रकार होते. माझा ड्रेस अगदी खराब होऊन गेला. मला खरचटलं पण. मला खूप रडू येत होत. खूप एकटं वाटत होत.

कसाबसा तो दिवस संपला. परत जाताना आई घ्यायला आलेली. मी एक शब्दही बोलले नाही तिच्याशी. नंतर दुसऱ्यादिवशी, म्हणजे १० नोव्हेंबरला घरी केक आणला होता. पण माझा अजिबात मूड नव्हता. माझ्या सगळ्या त्या वर्षीच्या वाढदिवसाच्या फोटोमध्ये मी मख्खासारखा रडायच्या घाईला आलेला चेहरा करून उभी आहे. त्यानंतर मी कधीही माझ्या आईबाबांनी सांगितलं म्हणून मला न करावीशी वाटणारी गोष्ट मी केली नाही. त्यानंतर पण खूप सारे वाढदिवस वाईट गेले. पण नंतर इतरांशी बोलल्यावर कळलं कि सगळ्यांची हीच कथा होती. वाढदिवस आनंदात जाणं हे बहुतेकांच्या सोबत क्वचितच घडलं होत. मग मला वाईट वाटायचं बंद झालं. किंबहुना वाढदिवसासाठी काही वेगळं करायचं असत हेच मी विसरून गेले. आणि जेव्हा कोणतीही अपेक्षा नव्हती तेव्हा माझा वाढदिवस खूप आनंदात गेला. तो माझा २०१८ चा वाढदिवस होता.

बाबांचा मला कॅम्पला पाठवण्याचा उद्देश नक्कीच चांगला होता. कदाचित थोडी मोठी असते तर मला तो कॅम्प एन्जॉय पण करता आला असता. असो. पण त्यानंतर मी कधीच कोणाच्याच इमोशनल मॅनिप्युलेशनला बळी पडले नाही.