पिपांत मेले ओल्या उंदिर…

पिपांत मेले ओल्या उंदिर;

माना पडल्या, मुरगळल्याविण;

ओठांवरती ओठ मिळाले;

माना पडल्या, आसक्तीविण.

गरिब बिचारे बिळांत जगले,

पिपांत मेले उचकी देउन;

दिवस सांडला घाऱ्या डोळीं

गात्रलिंग अन् धुऊन घेउन.

जगायची पण सक्ती आहे;

मरायची पण सक्ती आहे.

उदासतेला जहरी डोळे

काचेचे पण;

मधाळ पोळे;

ओठांवरती जमले तेंही

बेकलाइटी, बेकलाइटी!

ओठांवरती ओठ लागले;

पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!

ह्या कवितेचा मला समजलेला अर्थ देतेय. इथे उंदीर हे एक रूपक आहे. जगण्याची धडपड करता करता रंजलेले गांजलेले लोक. शहरातील मजूरवर्ग. झोपडपट्टीच्या पिंपात जगण्यासाठीचा लढा प्रत्येक दिवशी देणारे लोक. ज्यांच्या ना जन्माचा हिशोब आहे ना मरणाची दाद आहे. ज्यांना आयुष्यातील चांगली हवा, शुद्ध पाणी, पोटभर जेवण, शिक्षण अशा मूलभूत गरजाही नाकारल्या गेल्या आहेत. ज्यांच्या राष्ट्रीयत्वाचा काही पुरावा नाही. या राष्ट्राचे नागरिक असूनही ज्यांना त्याचा काही उपयोग झाला नाही,अशा लोकांची फिर्याद कवी मांडतो आहे.

Rain, chill or heatwave, homeless poor have few places to turn to ...

जगण्याची सक्ती तर प्रत्येकाला आहे, कितीही वाईट परिस्थिती असली तरी मृत्यूला जवळ घेणे सर्वाना जमते असे नाही. त्यांनी ते करूही नये. पण जगण्याला काही अर्थ नसलेले जगणे जगण्याचीही सक्ती आहे. आणि अशावेळी मृत्यू सगळ्यात स्वस्त याच लोकांसाठी आहे. ट्रेन खाली सापडून, कुपोषणाला बळी पडून, साध्या साध्या आजारांना पैसे नसल्यामुळे, व्यसनांच्या आहारी जाऊन, किंवा कसंही…मृत्यू स्वस्त तर याच वर्गासाठी आहे.

आणि असं जगत असताना मानवाची शृंगाराची आदिम प्रेरणाही संपत नाही. याच प्रेरणेने तर मानववंश जिवंत ठेवलाय. प्रेम संपून गेलेलं असतानाही वासनेची भूक भागावी म्हणून शृंगारात आनंद शोधणारे लोक. असे लोक तुम्हाला रडताना दिसणार नाहीत. दिवसेंदिवस तोच तोच जगण्याचा लढा देऊन त्यांचे अश्रू आटून गेलेत. काचेचे झालेत डोळे. स्निग्धता आटून गेलीय.

असं जीवनाचं अतिशय उदास चित्र कवी रंगवतो. पण मला हे चित्र पटत नाही.

माणसासाठी आशा हि जगण्याचं कारण आहे.

कितीही वाईट परिस्थितीत माणूस जगतो कारण त्याला आशा असते कि उद्याचा दिवस नवा असेल, उद्याचा दिवस माझा असेल.

पुन्हा उजाडेल हा माणसाचा दुर्दम्य विश्वास आहे.

अशाच झोपडपट्टीतून खूप कष्ट करून जेव्हा लोक शिकतात आणि जिद्दीने वर येतात तेव्हा तो संपूर्ण मानवजातीचा विजय असतो. आणि अशी लोक बाकीच्या दुर्दैवाचे दशावतार भोगणाऱ्या लोकांना जगण्याची उमेद देतात.