मनातले चांदणे : मधू मंगेश कर्णिक

मला सहावीला एक धडा होता, ‘मनातले चांदणे’. मधू मंगेश कर्णिक यांचा. माझा पहिली ते दहावी पर्यंतचा अत्यंत आवडता धडा. ही गोष्ट होती बल्लूची. आणि त्याच्या अत्यंत सुंदर आणि नाजूक स्वप्नाची. बल्लू उर्फ बल्लव हा लेखकाच्या घरी वर्तमानपत्र टाकायला यायचा तेव्हा त्याची लेखकाशी ओळख झाली. लेखकाला काम करून शाळा शिकणाऱ्या बल्लव बद्दल ममत्त्व वाटलं. त्यांनी त्याला मायेने वागवलं. त्याला काही पुस्तक वाचायला दिली. बल्लूला कर्णिक लेखक आहेत हे माहित होत. एक दिवस त्यांचं एक पुस्तक तो घेऊन आला.त्यात निसर्गसुंदर कोकणाचं वर्णन होत. त्याने कर्णिकांना सांगितलं,”तुम्ही लिहिलेलं हे पुस्तक मला अतिशय आवडल. तुमचं कोकण किती सुंदर असेल ना.” कर्णिक म्हणाले, “प्रत्येकाला आपला गाव सुंदर वाटतो. तुझंही गाव असेलच ना.” बल्लू खिन्न होऊन म्हणाला,”आम्हाला गावच नाही.आईबाबा मुंबईला येऊन खूप वर्ष झाली. मी मुंबई मध्येच वाढलो. डोंगर,नदी, पशु पक्षी मी कधीच पाहिले नाहीत. तुम्ही न्याल मला तुमच्या गावी? तुमच्या कौलारू घराच्या अंगणात येणार चांदणं मला पाहायचं आहे.” लेखकाचं काळीज हेलावलं. त्यांनी बल्लूला त्यांच्या गावी न्यायचं आश्वासन दिलं. पण ते भाग्य कदाचित बल्लूच्या नशिबात नव्हतं. लवकरच लेखकाने घर बदललं. आणि नवी जागा, नवा परिसर, शहरातली धावपळ यामध्ये बल्लूला विसरूनही गेले.

पण काही वर्षांनी त्यांची आणि बल्लवची परत भेट झाली. एका निबंधस्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी लेखकाला आमंत्रण होत. त्या स्पर्धेत बल्लवला प्रथम पारितोषिक मिळालं होत. त्याच्या निबंधाचे नाव होते, “मला न भेटलेले चांदणे “. त्याच्या सुरवातीला बल्लूने आपल्या वळणदार अक्षरात लिहिले होते, “माझं एक चिमुकलं स्वप्न आहे,मुंबईबाहेर कुठेही खेड्यात माझं एक कौलारू घर असावं. त्याला एक टुमदार अंगण असावं. त्या अंगणात पौर्णिमेचं चांदणं रांगत यावं. आणि त्याला मी कडेवर उचलून घ्यावं.” बल्लू आता मोठा झाला होता. त्याने लेखकाचा पत्ता घेतला. लेखकाला वाटलं, तो भेटायला येईल.पण तो आला नाही. त्याच पत्र आलं. त्यात त्याने लिहिलं होत,”सर तुमच्या पुस्तकावरून मला त्या लेखाची प्रेरणा मिळाली.तुम्ही मला गावी चांदणं दाखवायला नेणार होतात ते मी विसरलो नाही.पण मध्ये खूप गोष्टी घडल्या. बाबा वारले. आई आजारी असते. मी शिकताशिकता दोन नोकऱ्या करतो.मला तुमच्या गावी येणं शक्य नाही.काही लोकांना आयुष्यात सतत उन्हातुनच चालावं लागत. चांदणं त्यांना कधी भेटतच नाही. पण तुमच्या प्रेमामुळे मला चांदण्याचा एक कवडसा मिळाला. तो मला पुरेसा आहे….” बल्लूने पत्रावर स्वतःचा पत्ता लिहिला नव्हता.

मी हा धडा वाचताना खूप रडले होते. माझ्या बाबांची कथा जवळपास सारखीच होती. नव्हे १९८०-१९९० च्या दशकात अनेक लोकांची कथा जवळपास सारखी होती. कामासाठी आपलं गाव सोडून माणसं जगायला बाहेर पडलेली. आपल्या गावाच्या आठवणींमध्ये रमलेली. आयुष्यात कधीतरी परत गावी जाऊन राहण्याचं स्वप्न पाहणारी. आख्ख आयुष्य उन्हातून चालणारी. मी शहरात वाढले. तेव्हा मी चाळीत राहायचे. चांदणं मीसुद्धा मुंबईमध्ये कधी पाहिलं नव्हतं. पण सुदैवाने मला गाव होत. गावात प्रेम करणारी माणसं होती. मी गावी जाऊन त्या चांदण्यात फिरलेय.आणि ती शांती अनुभवली आहे.

एखाद्याच इतकं चिमुकलं आणि इतकं गोड स्वप्न असावं, आणि नियतीने त्यांना तेवढंही नाकारावं, आणि तरीही त्यांनी त्याबद्दल तक्रार करू नये. या गोष्टीने माझ्यावर खूप परिणाम केला. माझा हा आजतागायात आवडता धडा आहे.