मातृसत्ताकपद्धतीतील लग्ने

आपल्या भारतात साधारणपणे लग्न झाल्यावर मुली मुलांच्या घरी जातात.

परदेशात म्हणजे पाश्चिमात्य देशातला प्रकार वेगळा आहे. तिकडे साधारण अठरा एकोणीस वर्षांची मुलं घर सोडून आई बाबांपासून वेगळी राहू लागतात. मग मुलगा असो व मुलगी. लग्न झाल्यानंतरसुद्धा सोय बघितली जाते. जर मुलाच्या घरात राहणं सोयीस्कर असेल, तर मुलगी मुलाकडे राह्यला जाते. आणि जर मुलीचं घर अधिक सोयीस्कर असेल तर मुलगा मुलिच्या घरात राहू लागतो.

पण जगाच्या काही भागात मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात आहे

१. मोसुओ चीन

इथे बायका विवाह करत नाहीत. पुरुष त्यांच्यासोबत जोडीदार म्हणून राहतात. मालमत्तेचे अधिकार हे स्त्रियांकडून स्त्रियांकडे जातात. मुले वाढविण्याची जबाबदारी स्त्रियांवर असते. यांच्याकडे चालत्याफिरत्या लग्नाची पद्धत आहे. स्त्रिया चक्क चालत त्यांना हव्या असलेल्या पुरुषाच्या घरात जातात. उभयता कधीच एकत्र राहत नाहीत. बऱ्याच वेळेला मुलांच्या वडिलांचं नावही माहित नसत.

२. ब्रिब्री, कोस्टा रिका

ब्रिब्री जमातींमध्येही जमिनीचे मालकी हक्क हे स्त्रियांकडे असतात. घराणं स्त्रियांच्या नावाने ओळखलं जात.

३. उमोजा, केनिया

या जागेला बिनपुरुषांची जमीन म्हणतात. कारण पुरुषांना इथे यायला बंदी आहे. स्वाहिली भाषेत उमोजा म्हणजे एकता. या भागातील स्त्रियांनी बरीच वर्ष पुरुषांकडून होणाऱ्या हिंसेला तोंड दिले होते. म्हणून त्यांनी १९९० साली पुढाकार घेऊन, पुरुषांना गावाबाहेर हाकलून लावले.

४. मीनांकाबू , इंडोनेशिया

हा जगातला सर्वात मोठा मातृसत्ताक समाज (सुमारे चाळीस लाख) आहे. या समाजात लग्नाची परवानगी आहे. आई हा समाजातला सर्वात महत्त्वाचा घटक मनाला जातो. पुरुष राजकीय आणि आध्यात्मिक बाबींमध्ये लक्ष घालतात. पण घरगुती गोष्टींमध्ये स्त्रियांचे वर्चस्व असते. त्यांना अशा अधिकाराच्या विभागणीमुळे आपल्याला समान हक्क मिळतात असे वाटते. लग्न झाल्यानंतर स्त्रीला स्वतःची खोली मिळते. नवरा तिच्यासोबत रात्र घालवू शकतो, पण सकाळी उठून त्याला आईच्या घरी नाश्त्यासाठी जावं लागत. वयाच्या दहाव्यावर्षी मुले (पुरुष) पुरुषांसाठीच्या quarters मध्ये राहायला जातात. जरी घराण्याचा प्रमुख नेहमीच पुरुष असतो तरी त्याला निवडून मात्र स्त्रिया देतात आणि त्या त्याला काढूनही टाकू शकतात.

५. अकान, घाना

इथेहि मुले आईच्या घराण्याचं नाव लावतात. पण इथे पुरुष नेतृत्व करू शकतात. पुरुषांनी स्वतःच्या घरासाठी काही करणं अपेक्षित नसत. पण त्यांनी त्यांचा स्त्री नातेवाईकांना (आई, बहीण इत्यादी) मदत करणं अपेक्षित असत.

६. खासी, इंडिया

या ठिकाणी तर पुरुषांना घरातल्या समारंभांना हजेरी लावायची परवानगीही नसते. लग्न झाल्यावर मुलगा मुलीचे नाव लावतो. लग्न झाल्यावर पुरुष बायकोच्या घरी जाऊन राहतात. संतती आईचे नाव लावते. त्यामुळे साहजिकच कोणतेही मूल बेवारस समजले जात नाही.