रानफूल आणि फुलपाखरू

साजिरे गोजिरे रानफूल
त्याची पडे रानाला भूल
फुलाला काय त्याचे
आपल्याच मस्तीत ते नाचे
एकदा काय झाले
एक फुलपाखरू जवळ आले
फुलापाशी उडू लागले
फुलपाखराला सुचेना काही
रानफूलाची त्याला नवलाई
फूल झाले त्याचा मित्र
गप्पांना त्यांच्या मिळेना अंत
पण फुलाचे आयुष्य असायचे केवढे
चार दिवस फक्त रंगाचे सोहळे
एक एक पाकळी लागली गळू
फूल लागले कोमेजू
फुलपाखराला काही सुचेना
डोळ्याचे पाणी ढळेना
रात्रंदिवस फुलाजवळ बसे
कुठे जावे
काय करावे
बिचाऱ्याला काहीच न सुचे
शेवटची पाकळी गळे
फुलाची प्राणज्योत मावळे
फुलपाखराच्या व्यथेला
नाही राहिला पारावार
मिठी मारी फुलाला हळुवार
फुलाच्या होते काटे देठाला
बोचले सारे फुलपाखराच्या अंगाला
फुलपाखराचे रंग पसरले फुलाच्या देठावर
फुलपाखरू अडकले मित्राच्या मृतदेहावर
तिथेच त्यागिला त्याने देह
अनुपम होता त्यांचा स्नेह
साऱ्या वनाने आसवे टिपली
वनराणीला ही वार्ता गेली
हृदय तिचे भरून आले
प्रेमाने होते मरण जिंकले
हळुवार हातानी तिने दोघांना स्पर्शले
वात्सल्याने उराशी धरले
तिच्या प्रेमाचा स्पर्श होता
नवजीवन लाभे दोघा मित्रांना
फुलपाखराचे पंख लागले चमकू
फुलाला लागली नवी पालवी फुटू
ते फूल नंतर कधी ना कोमेजले
फुलपाखरासोबत झुलत राहिले
गोष्ट पोचली साऱ्या वनात
जिवंत राहिली वन कथात
अजूनही कधी वारा गातो गाणी
प्रेमाची ही नवलकहाणी

-मधुराणी

1920x1080, Download4 Â - Beautiful Animated Fairy - 1920x1080 ...