इच्छा

ओठांची ही देणीघेणी
जाता जाता द्यावी घ्यावी
वळणावरी त्या जिन्याच्या
हिशोबाची चुकती व्हावी
केसात मोकळ्या माझ्या
मंतरलेली दुपार असावी
मानेखालच्या तिळाची
गोडी तू अचूक टिपावी
सकाळच्या थरथर स्वप्नाची
सांगता माध्यानी व्हावी
तुझ्या कुशीत मिटताना
अलवार ओली पहाट यावी
पडद्यातून झिरपणारे ऊन
माझ्या अंगाला बिलगावे
त्या किरणांचा मत्सर वाटून
तू मला जवळी घ्यावे
एकांतातली लाडी गोडी
तू केलेली माझी खोडी
आठवून मज हसू यावे
कुणी पुसता मजला कारण
मला काही काही न सुचावे
तुझ्या बोटांची जादू माझ्या
अंगाअंगावरून फिरावी
तुझ्यावेगळ्या अस्तित्वाची
कल्पनाच मज जरा नुरावी
असे असावे जीवन माझे
तुझ्यासोबत असताना
शाश्वत ही कमी पडावे
तुझ्या सोबत चालताना
-मधुराणी