चूक

तुझ्या शब्दांना मी खरे मानले होते
का बर पुन्हा मी तशीच चुकले होते

आधीही शब्द मोडले होते
काळीज आधीही तुटले होते
तुकडे काळजाचे सांधताना
मी किती किती विखुरले होते
विसरून साऱ्या शंका तरीही
नव्याने तुला जवळ घेतले होते

तुझ्या शब्दांना मी खरे मानले होते
का बर पुन्हा मी तशीच चुकले होते

विसरायचे सारे; मी ठरवले होते
आठवांचे साऱ्या तर्पण केले होते
नवे रस्ते, नवे लोक, नवे आयुष्य;
किती किती मी बावरले होते
वाटेत येऊन तू जरा हात धरलास
अन तुझ्या कुशीत मी कोसळले होते

तुझ्या शब्दांना मी खरे मानले होते
का बर पुन्हा मी तशीच चुकले होते

दरेकवेळी नवे तुझ्याकडे बहाणे होते
तुझ्या डोळ्यात भाव नव्याने होते
दाखवले नाही पण मला समजले रे
कि ते भाव किती अल्पायुषी होते
तुझा दोष नाही तसा; माझेच हे
तुझ्यावर जीव ओवाळणे जुने होते

तुझ्या शब्दांना मी खरे मानले होते
का बर पुन्हा मी तशीच चुकले होते

– मधुराणी