ती आणि मी

तिचं आणि माझं पूर्वी फारसं पटत नसे. विळ्या भोपळ्याचंच नातं म्हणा ना! पण काही उपाय नव्हता. आम्हाला एकत्र राहणं भाग होतं. आमची ओळख तशी फार जुनी. म्हणजे मी जवळपास जन्मल्यापासूनच ओळखते म्हणा ना तिला. कोणत्याही नवीन नात्यामध्ये रुळायला माणसाला वेळ लागतोच! तसाच वेळ आम्हालाही लागला . सुरवातीची काही वर्ष फार अवघड होती. हळू हळू मतभेद विरले.हे व्हायला चांगली वीस वर्ष जावी लागली.पण आता सगळं ठीक आहे. खरं तर आता आमची चांगली मैत्री झालीय. तुम्हाला कळलंच असेल मी कोणाबद्दल म्हणतेय ते! माझ्या आईबद्दल.

बराच ओरडा आणि मार खाल्लाय मी तिच्याकडून! लहानपणी आई बद्दल लिहिलेल्या सगळ्या कविता खोटया वाटायच्या.पुस्तकामधली आई प्रेम, करुणा,त्याग , दया यांचं मूर्तिमंत रूप असायची.पण प्रत्यक्ष अनुभव काही निराळाच निघाला. सगळी पुस्तकं आपली दिशाभूल करत आहेत असे वाटे. तसं तर आपल्या या प्राणप्रिय भारतभूमीवर आई वडीलांकडून मुलांनी मार खाणं फारसं नवीन नाही. पण माझी तक्रार विनाकारण मार खाण्याबद्दल आहे. मी तसं तर खूप गुणी बाळ होते. स्वतःचा अभ्यास स्वतः करायचे. खेळायला मला जबरदस्ती पाठवावे लागे. फालतू मित्र मैत्रिणींची संगत नव्हती.( हे सगळे गुण वाढत्या वयासोबत आटत गेले हे जाता जातासांगायला काही हरकत नाही.) तरीही मी बराच मार आणि ओरडा खाल्लाय. सांगते का ते.

वेंधळेपणा हा माझ्या आईच्या लेखी अक्षम्य अपराध होता. शाळेत डबा विसरून येणे ,पेनसिली, रुमाल, खोडरबर हरवणे या कारणासाठी रोज एकदातरी ओरडा खाल्ल्याशिवाय माझा दिवस सार्थकी लागत नसे. पुस्तकात एक कविता होती. त्याच्यात एक लहान मुलगा खेळता खेळता पडतो , मग त्याची आई त्याला येऊन उचलून घेते, त्याला पापा देते, त्याचे अश्रू पुसते असं काहीस वर्णन होतं. हे वर्णन आमच्याबाबतीत कधीच खरे झाले नाही. आम्ही चालताना पडलो तर वरून धपाटा पडे. “तोंड वर करून कुठे चालली होतीस ? ” हे वरून ऐकावं लागे.

शाळेत जाताना दोन वेण्या बांधून जावं लागे. तो तर युद्धाचाच प्रसंग. एकतर माझे नखरे खूप. त्यातून तिच्यात संयम आणि कलात्मकता दोन्हीचा अभाव. घनघोर भांडणं होत. केस कापून टाक हे ऐकावं लागे. म्हणून लवकरात लवकर स्वावलंबन शिकावं लागलं. मानेवर तलवार ठेवून नाही म्हणता येणार; पण मानेवर कात्री ठेवून का होईना मला आईने स्वावलंबनाचे धडे दिले.

त्यातून ते शाळेमधले निबंध ! दर वर्षी एकदातरी “माझी आई” हा निबंध आमच्याकडून लिहून घेतला जाई. माझी आई, माझा गाव या दोन्ही निबंधात मी खूप वेळा खोटी माहिती लिहिली आहे. आमच्या मराठवाड्यातल्या माझ्या ओसाड गावाचं वर्णन करताना हिरवागार, निसर्गसौंदर्याने नटलेला असली विशेषणे वापरली आहेत. गावात एक नदी वाहते असं खोटंच लिहून, तिला स्वतःच्या मनाने दरवर्षी नवे नाव बहाल केले आहे. माझ्या माळरानावर वसलेल्या गावाला माझ्या मनाने मी मृत्युंजय कादंबरी मधल्या गावाप्रमाणे चारीबाजूने टेकडयांनी वेढून टाकले आहे. तसंच आई या निबंधात माझ्या आईला प्रेमळ , दयामूर्ती , कारुण्यस्वरूप , वात्सल्यसिंधू वगैरे विशेषणे बहाल केली आहेत. त्या कोवळ्यावयात खोटं बोलणं पाप वाटे. आता मी निर्ढावले. काहीकाही वेळेला तर इतक्या वेळेस एकच खोटे बोलले आहे कि खरं काय आहे ते मला माहित असूनही मी विसरून गेलेय .आता लहानपणीच खोटं “लिहायची” शाळेने सवय केल्यावर दुसरं काय होणार म्हणा!

हळू हळू परिस्थिती सुधारली. आता तर तिचं माझ्याशिवाय आणि माझं तिच्याशिवाय पान हलत नाही. ती एक पंचेचाळीस वर्षांची पंचवीस वर्षांच्या मुलीची आई आहे. म्हणजे तिचं लग्न लवकर झालं हे ओघाने आलंच. तिचं मन फारसं कधी शालेय पुस्तकांच्या जगात रमलं नाही म्हणा ना! पुस्तकं वाचण्यासाठी जो संयम लागतो तो तिच्यात अजिबातच नाहीय. लग्न झाल्यानंतर मात्र तिने बऱ्यापैकी वाचनाची कसर भरून काढली.

पण तिचं पहिलं प्रेम मात्र TV वर. या madbox ने तिच्यावर प्रचंड मोहिनी घातली आहे. ती दिवसाला जवळपास बारा सिरिअल्स बघते. ज्या सिरिअल्स TV वर एकाच वेळी लागतात म्हणून ती पाहू शकत नाही त्या ती नंतर मोबाईलवर बघते. मोबाइलला वर VOOT सारख्या फालतू application वर सिरिअल्स स्वतः लावून पाहू शकणारी माझी आई मोबाईल सायलेंट वर कसा ठेवायचा हे मात्र नेहमी विसरते. अजबच आहे नाही का!

ती प्रचंड उत्साही आहे. तिचा उत्साह हा कोकाकोला सारखा फसफसत असतो नुसता. कोणतही काम करायचं असेल तर ते लगेच करून टाकण्याकडे कल असतो. धीर, सबुरी हे शब्द माहीतच नसावेत तिला. त्यातून उपयुक्ततावाद हा तिच्या सर्व जीवनाचा पाया आहे. विनाकारण कलाकुसर करण्याकडे ओढा कमीच . काम झालं पाहिजे याकडे लक्ष अधिक. मात्र तिच्यात उत्तम विनोदबुद्धी आहे. ती चक्क मिमिक्री करू शकते लोकांची. मला हे नाही जमत दुर्दैवाने.

मला कधी कधी वाटत की मी खूप तिच्यासारखीच आहे. माझ्यात जो प्रचंड उत्साह आहे तो तिचीच तर देणगी आहे.तिचा जो प्रचंड आत्मविश्वास आहे तो माझ्यातही आलाय.ती खेड्यात वाढली. तिकडचा अकृत्रिम गोडवा तिच्यात अजूनही टिकून आहे. लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणं हे ती कर्तव्य म्हणून नाही करत. तिला स्वतःला ते केल्याशिवाय चैन पडत नाही म्हणून करते. किती लोकांचे संसार उभे केलेत तिने! दहाबारा संसारांना तरी तिने नक्कीच हातभर लावला असेल. तिच्यातला हा लोकांना मदत करण्याचा गुण माझ्यातही आलाय थोडाफार. फक्त ती जास्त निरागस राहिलीय वाढत्या वयातसुद्धा. अजूनही ती खोटं बोलू शकत नाही.तिच्या डोळ्यात खूप खरेपणा आहे. माझ्यात तेवढा आहे कि नाही हे मी मात्र छातीवर हात ठेवून नाही सांगू शकत. ती कोणाचीही तोंडावर खोटी तारीफ करू शकत नाही कि राग आला असेल तर लपवू शकत नाही. मी मात्र खूप वेळा डिप्लोमॅटिक वागते. राग आला असेल तरी काही काही वेळा एक्सप्रेस करत नाही.

तिचं माझ्यावर अकृत्रिम प्रेम आहे. तिला जे करणं शक्य झालं नाही ते ते सर्व मला करता यावं असं तिला वाटत. त्यासाठी मी खूप शिकावं असाही तिला वाटत. जर तिला शक्य असतं तर तिने मला याच जन्मात CA , doctor , engineer , CS… सगळ्या डिग्र्या घ्यायला लावल्या असत्या.

या सर्वांपेक्षा अधिक मला जर तिच्यातील गुण आवडत असेल तर तिचं न्यायाचा आग्रह. जेव्हा जेव्हा तिला तिच्यावर अन्याय होतोय असं वाटल तेव्हा तेव्हा तिने स्वतःसाठी लढा दिला. तिचा लढा लहान होता. लहान विषयांसाठी होता हे खरंच. पण स्वतःचा आवाज तिने कोणालाच दाबू दिला नाही. लहानपणी कधी कधी हे चुकीचं वाटे. असं वाटायचं, आई का भांडते. का मोठ्यांचं विनातक्रार ऐकत नाही. पण आता कळतं, तिचं ते स्वतःची बाजू घेऊन स्वतःसाठी इतर कोणाचाही आधार न घेता उभं राहणं किती महत्वाचं होत ते! आणि मग अजूनच मन अभिमानाने भरून येत. एक स्त्री म्हणून निःसंशय ती माझा आदर्श आहे.

तिने फक्त मला वाढवलं नाही. तर मला स्वतःचा आवाज दिला. मला आत्मविश्वास दिला. आता त्या सर्व न उमगलेल्या, न खऱ्या वाटणाऱ्या कवितांचा अर्थ कळतो . ती मला आणि मी तिला एकमेकांपासून पूर्णपणे कधीच वेगळे करू शकत नाही. आम्ही एकमेकींच्या अस्तित्वाचा भाग आहोत. तिने माझ्यासाठी काय काय केलंय हे माझ्यासाठी महत्वाचं आहेच. पण त्याहूनही महत्वाचं आहे तिचं फक्त माझ्या आयुष्यात असणं. “ती नसती तर ?” या प्रश्नातच तिच्या असण्याचे श्रेय दडलेले आहे.

Thanks for being there for me aai.