जर मराठीमध्ये आजपर्यंत मनाविषयी जर काही अति ग्रेट लिखाण झालं असेल तर ते म्हणजे मनाचे श्लोक.
दुर्दैवाने आपण ते लहान मुलांकडून पाठ करवून घेतो. ज्याचा अर्थ त्यांना समजत नाही. आणि आपण त्यांना सांगत नाही. वास्तविक मनाच्या संबंधी प्रश्न पाडण्याचं त्यांचं वय नाही. ते प्रश्न पडतात मोठ्यांना! लहानपणी कधीतरी वाचलेले आणि न कळलेले मनाचे श्लोक अशावेळी कसे आठवतील?
स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी, आणि स्वतःला आनंदाचा, ऊर्जेचा स्रोत बनवण्यासाठी जर काही वाचण्याची गरज असेल तर “मनाच्या श्लोकांना” पर्याय नाही. प्रत्येक ओळी मध्ये एक एक खोल विचार आहे. चिंतन आहे. एक थेरपीच म्हणा ना. मनाला निर्लेप आणि दुःखमुक्त करण्यासाठी मनाच्या श्लोकांचा पाठांतर नव्हे तर मनन आणि चिंतन खूप उपयोगी पडेल.
मना वासना दुष्ट कामा न ये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सार वीचार राहो||
मनाला समजवा. बा मना, सर्व वाईट विचारांचा त्याग कर. पापाचा विचारही सोडून दे. कधीही अनीतीने वागू नकोस. शांती आणि समाधानाचा हाच तर मार्ग आहे.
नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु॥
राग हा दुःखमयच असतो. राग धारण करणाऱ्याला आणि त्याच्या आसपासच्या व्यक्तींना तो तेवढाच अनिष्ट असतो. माझ्या मनाला काम, क्रोध आणि मत्सराचा स्पर्श न होवो. आजकाल कोण स्वतःच मन इतक निर्मल ठेवण्याचा प्रयत्न करत बर?शारीरिक स्वच्छतेकडे सर्वांचं लक्ष असत. पण मन निर्मल करण्याचा प्रयत्न सोडा, विचारही कोणी करत नाही.
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।
मना बोलणे नीच सोशीत जावें॥
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांसि रे नीववावें॥
धाडस आणि धैर्य हे मनात असावं. लोकांनी वाईट बोललं तरी ते सोडून द्यावं. पण स्वतः मात्र नेहमीच नम्र राहावं. आपल्या वाणीने दुसऱ्यांचे दुःख हलके करावे.
देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे।
परी अंतरीं सज्जना नीववावे॥
देहाचा त्याग केला, मृत्यू झाला तरीही कीर्ती मागे उरावी. ह्यासाठी कार्यतत्पर राहावं. चंदनाप्रमाणे स्वतः झिजून सर्वांना सुगंध द्यावा.
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे।
न होतां मनासारिखें दु:ख मोठे॥
मनासारखं झालं नाही, तर आपणास किती बर दुःख होत! पण ते आपण केलेल्या पापांचच तर फळ नव्हे काय!
जनीं सर्वसूखी असा कोण आहे।
विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।
तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥
जगात संपूर्णपणे सुखी आणि समाधानी कोण आहे? मन तू विचारी आहेस, तूच स्वतःला विचारून बघ. तूच जी कर्मे केलीस त्यांची फळे तू आज भोगतो आहेस, तर दुःख कशाचं?लोकांसोबत स्वतःची तुलना करणं सोडून दे. कारण तो मार्ग केवळ दुःखाकडे नेतो.
मना मानसीं दु:ख आणूं नको रे।
मना सर्वथा शोक चिंता नको रे॥
विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी।
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी॥
जे दुःख आहे ते केवळ मनात आहे. त्याची चिंता केल्याने ते वाढणार आहे. मग ते मनात घेऊन बसण्यात काय अर्थ आहे? आपल्या आनंदाचा मार्ग आपणच बंद केल्यासारखं नाही का ते? देहासोबत होणाऱ्या वाईट गोष्टींना विसरून जा. तटस्थपणे घडणाऱ्या घटना बघ. त्यांना मनात ठेवू नकोस. आणि मुक्तीचा आनंद घे.
मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते।
अकस्मात होणार होऊनि जाते॥
घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।
मतीमंद तें खेद मानी वियोगें॥
आपण चिंता करून काय होणार? जे घडणार आहे ते घडणारच आहे. सुख आणि दुःख हे कर्माने प्राप्त होत. केवळ एक मूर्ख व्यक्तीच हवं ते गमावल्यावर शोक करतो. कारण शोक हा व्यर्थ आहे.
जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची।
तया भोजनाची रुची प्राप्त कैची॥
अहंभाव ज्या मानसीचा विरेना।
तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना॥
ज्याने अहंकाराच्या जाणिवेची माशी भक्षण केली आहे त्याला जेवणाचा स्वाद कसा मिळेल?अहंकारी व्यक्तीला ज्ञान कसे बर पचेल? खरा ज्ञानी व्यक्ती तोच आहे ज्याच्यात अहंकार नाही.
अहंतागुणे सर्वही दुःख होते।
मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते॥
सुखी राहता सर्वही सूख आहे।
अहंता तुझी तुंचि शोधुन पाहे॥
अहंकारामुळे काय होत नाही? दुःख मिळत. आपल्या बोलण्याला वजन राहत नाही. आपली कोणी किंमत ठेवत नाही. आपल्या अहंकारच मूळ आपल्या स्वतःलाच शोधून काढायचं आहे. आणि ते उपटून फेकून द्यायचं आहे.
एकएका ओळीवर एक एक प्रबंध होऊ शकेल. मी माझ्या अल्पमतीप्रमाणे काही श्लोकांचा थोडक्यात अर्थ सांगितला आहे.
मी काही श्लोक वर उधृत केले आहेत. अजून जाणून घेण्यासाठी मनाच्या श्लोकांच पुस्तक नक्की वाचा. विकीपीडियावरही मिळतील. मनाचे श्लोक – विकिस्रोत
मी असं म्हणणार नाही की त्यातील सर्वच विचारांशी मी सहमत आहे. पण विवेके विचारे विवंचुनि पाहे (स्वतःच्या विवेकाने विचार करा आणि विचार पारखून घ्या) असं समर्थांनीच सांगितलं आहे. त्यामुळे ज्याने त्याने स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीला विचारून मनाच्या श्लोकांच चिंतन करावं.
इति लेखनसीमा.