रात्री असती वेड्या

रात्री असती वेड्या
दिवस पुरे शहाणे
आठवणीत रमाया
रात्री मिळती बहाणे


वेड्याखुळ्या एका राती
सांगितले तुजला सारे
तुला मिठीत घेताना
साक्ष होते चंद्र तारे


उर धपापले जरा
डोळे झुकलेले होते
नादावलेल्या माझ्या मनी
शंका प्रश्न काही नव्हते


फक्त तू होतास खरा
अन ती रात्र होती खरी
बोटांनी पाठीवर लिहिलेली
तुझी गाणी होती खरी

एकच होती रात्र ती
पण माझ्या मनी अमर
बळ देते जगायला
तुझ्या आठवणींचे जहर


-मधुराणी