पौरुष

तुझ्या मानेच्या उभारात
अन पाठीच्या धनुष्यात
केसांच्या लहरी झुलुपात
अन तुझ्या आवाजाच्या खर्जात
जीव अडकलाय माझा.
अन अडकलाय जीव माझा
तुझ्या हातावरच्या निळसर हिरवट रेषांमध्ये …
पण त्याहून आहे लोभस
तुझ्या डोळ्यातील आत्मविश्वास आणि कारुण्य…
तुझ्या शब्दातील मार्दव अन मर्यादा…
तुझ्या हास्यातील उदारता अन तुझ्या विचारातील सौंदर्य. ..
तुझ्या मनातला माझ्याप्रतीचा आदर अन
माझ्यासाठीच अथांग, भोळभाबड, गोंडस प्रेम…
तू जेव्हा तुझ्या भाची सोबत खेळत असतोस. ..
हेवा वाटतो मला तिचा. ..
तुझ्या सारखाच मलाही मामा असायला हवा होता…
हट्ट करायला. .. लाड करायला…
जेव्हा तू फॉर्मल शर्ट घालून स्लीव्जस दुमडतोस. ..
आणि केसांमधून तुझी लांबसडक बोट फिरवतोस.. .
माझं जग काही सेंकंद थांबत. ..
अन तुझ्या अस्तित्वाबद्दल धन्य वाटत. ..
तुला अर्थातच हे कळत नाही.
कारण माझे डोळे माझं गुपित जपून ठेवतात…..
कारण तुझ्या शर्टच वरच बटण लावून द्यायची माझी इच्छा. ..
ना माझे डोळे सांगतात. .. ना माझे ओठ. ..
नव्हे… तुला कळतही नाही कि मी तुला बघितलंय. ..
आईच्या आठवणीने भावव्याकूळ झालेला तू..
लहानूलाच वाटतोस. ..
मग दमलेल श्रांत मस्तक ठेवतोस तू माझ्या मांडीवर. ..
अन तुझा विळखा माझ्या भोवती.. .
तुझ्या केसातून हात फिरवताना. ..
मी प्रार्थना करते देवाकडे.. .
तुझ्या आईच प्रेम माझ्या हातात उतरू दे…
इतकं निष्पाप अन निर्व्याज . …
कारण तुझा हक्क आहे त्यावर… हो… तुझाच.. .
बाईकवर तू उधळतोस ना…
असा राग येतो… पण तुला माहिती आहे. ..
मागे बसलेल्या मलाही खूप मजा येतेय…
आणि मग मी धरून ठेवते घट्ट तुला…
आणि मग तू अजून उधळतोस. ..
असं वाटत. .. आपण क्षितीजाच्या पार जाऊ…
माझं जग माझ्या मिठीत सामावलेलं असत…
मी झोपेत असताना तू बघतोस माझ्याकडे.. .
तुला काय वाटलं… मला माहित नाही…??
पण मी डोळे नाही उघडत. .. का सांगू?
माझ्या सुखाला माझीच नजर नको लागायला. ..
तुझ्यासोबत मला भान राहत नाही मर्यादांच…
मी खूप उधळते. .. आणि तू काहीच बोलत नाहीस…
पण तू असतोस. .. साथ द्यायला. .
पडले तर हात द्यायला… तू आहेस …
खरंच वाटत नाही…
माझं जग व्यापून तू उरतोस. …
मला व्यापून तू उरतोस….
अपूर्ण असून तू पूर्ण आहेस. ..
मला वेडावणारा नाद आहेस. ..
सागर भरतीची गाज आहेस. ..
देवळातला घंटानाद आहेस. ..
आकाशातला मेघ आहेस. ..
अन माझी तू तपस्या आहेस. ..
माझं प्रेम. . . माझं जग. ..
माझं मन ..माझं संचित आहेस. ..

-मधुराणी

इथे वाचा : त्याच्या नजरेतून “ती”