व्यक्ती आणि वल्ली : माणसाच्या गुणावगुणांचा उत्सव

व्यक्ती आणि वल्ली. अनेक वर्षांपासून लोकप्रियतेच्या शिखरावर राहिलेलं एक सुंदर पुस्तक.

पुलंना एकदा कोणीतरी विचारलं होत, जर व्यक्ती आणि वल्लीमधील पात्रे तुम्हाला खरोखर भेटली तर तुम्ही काय कराल? पुलं म्हणाले होते,”त्यांना मी कडकडून भेटेन”

व्यक्ती आणि वल्ली मध्ये पुलंनी विविध व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. त्याची सुरवात झाली ती अण्णा वडगावकर या पात्रापासून. हे व्यक्तिचित्रण सुरवातीला एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते आणि या लेखानेच महाराष्ट्राचे लक्ष पुलंच्या लिखाणाकडे वेधले गेले.

अण्णा वडगावकर हे पात्र त्यांच्या इस्माईल कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या फणसाळकर मास्तरांवरून बेतलेले होते. त्यांचे संस्कृत शिकवणारे फणसाळकर मास्तर सतत “माय गुड फेलोज” अशी त्यांच्या वाक्याची सुरवात करत. अर्थात अण्णा वडगावकर हे पात्र संपूर्णपणे फणसाळकर मास्तरांचे व्यक्तिचित्र नाही.

हीच तर व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाची गम्मत आहे. यातील पात्रे आपल्याला ओळखीची वाटतात. आपणही कधीतरी अशा जीव तोडून शिकवणाऱ्या आणि वर्गात गम्मत आणणाऱ्या शिक्षकाला भेटलेलो असतो. त्यांच्या वर्गात बसलेलो असतो.

कधीतरी अतिशुद्ध मराठी बोलणाऱ्या सखाराम गटणेसोबत आपली ओळख झालेली असते.कधीतरी आपण भीती वाटावी इतक्या सभ्य, अतिनीटनेटक्या, “त्या चौकोनी” कुटुंबाला भेटलेलो असतो. त्यांच्या घरात अवघडून वावरलेले असतो. कधीतरी आपल्याला “तो” भेटलेला असतो, समाजाने बिनभरंवशाचा आणि चूक ठरवलेला, तरीही सर्वात खरा माणूस! एखादा नंदा प्रधान आपल्याही ओळखीचा असतो, सर्व असूनही एकटा! हेवा वाटावं असं आयुष्य जगूनही एकटा! एखाद्या इरसाल नामू परटाने आपल्यालाही इंगा दाखवलेला असतो. कोकणातला एखादा खट अंतू बरवा आपल्याला जीवनाचं सार सांगून गेलेला असतो. हि आणि अशी असंख्य पात्रं. आपल्या आजूबाजूला वावरणारी. इतक्यावर्षांपूर्वी मनुष्य स्वभावाचे असंख्य नमुने पुलंनी आपल्या लिखाणातून टिपले. आजही असे लोक आपल्याला भेटतात. जग सतत बदलत असत. पण मनुष्य स्वभाव फारसा बदलत नाही. म्हणूनच पुलंनी टिपलेली मनुष्य स्वभावाची वैशिष्ट्ये चिरंतन टवटवीत राहतात.

पुलंनी एका ठिकाणी म्हटलं होत, “मला पाहायला आवडतात माणसे, असंख्य स्वभावाची असंख्य नमुन्याची, माणसासारखं पाहण्यासारखं या जगात काहीच नाही.(…) माणसं चुकतात म्हणूनच जगायला मजा येते. समजा कोणीही खोट बोललं नसत, थापा मारल्या नसत्या, वेळेवर आली असती तर मग जगणं कंटाळवाणं झालं असत. माणसं चुकतात म्हणूनच जगायला मजा येते. “

व्यक्ती आणि वल्ली हा माणसाच्या सर्व भल्याबुऱ्या गुणावगुणांचा उत्सव आहे.