संतांचे योगदान

संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।

ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया ।।

नामा तयाचा किंकर। तेणे केला हा विस्तार ।।

जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।

बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।।

संत बहिणाबाईंचा हा अभंग. संतांनी महाराष्ट्राला आणि वारकरी संप्रदायाला दिलेले योगदान सुंदर रूपक देऊन दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.


ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया ।।

वारकरी सम्प्रदायाला संघटित रूप ज्ञानेश्वरांनी दिले. आणि त्याचा प्रसार केला. मूळ हिंदू धर्मशास्त्रे आणि पुराणे संस्कृत भाषेमध्ये होते. सर्वसामान्य प्राकृत भाषा (म्हणजेच तेव्हाची मराठी भाषा) बोलणाऱ्या लोकांना ते समजत नव्हते. याचा फायदा घेऊन पुरोहित वर्गाचे वर्चस्व वाढले. देवाचे आणि भक्ताचे नाते संपून पुरोहित वर्गाची दलाली चालू होते. देवा धर्माच्या नावाखाली, पूजेच्या आणि कर्मकांडाच्या नावाखाली लोकांना लुबाडले जात होते. फसवले जात होते. ज्ञानेश्वरांनी पुरोहित वर्गाची ही मक्तेदारी मोडून काढली. हिंदू धर्माचे तत्वज्ञान ज्यात सामावले आहे असा श्रीमद भगवदगीता हा ग्रंथ मराठीत आणला. आणि सर्वसामान्य जनतेसाठी ज्ञानाची कवाडं खुली केली. वारकरी संप्रदायाची सुरवात तिथून झाली. त्या आधीही पंढरपूरला आषाढी कार्तिकीला वारी जात असे. पण ती सर्वसमावेशक करण्यामध्ये ज्ञानेश्वरांचा मोठा हातभार आहे. वारकरी संप्रदायामध्ये भेदाभेद अमंगळ मानण्यात आला. नामस्मरणाचे महत्व सांगून बुवाबाजीला आळा घालण्यात आला. आणि या कार्याची सुरवात ज्ञानेश्वरांपासून झाली. म्हणून संत बहिणाबाईंनी ज्ञानेश्वरांनी पाया रचला असे म्हटले आहे. उगीच नाही वारीत “ग्यानबा तुकाराम” असा जयघोष होत !

नामा तयाचा किंकर। तेणे केला हा विस्तार ।।

किंकर म्हणजे गवंडी. नामदेवांच्या नावाची पायरी आहे पंढरपूरच्या मंदिराला असं मी ऐकलं आहे माझ्या आजोबांकडून. पूर्वीच्याकाळी बांधकाम करणाऱ्या वास्तुविशारदाचे नाव वास्तूच्या पायरीवर लिहिले जात असे. म्हणून कदाचित त्यांना किंकराची उपमा दिली असावी. नामदेव हे संतांच्या मांदियाळीतील दुसरे महान संत. त्यांनी भागवत धर्माचा विस्तार केला. त्यासाठी देशाटन केलं. अगदी उत्तरेतही गेले. आजही शिखांच्या धर्मग्रंथात नामदेवांनी लिहिलेली पदे आहेत. त्यांचे हि कार्य तितकेच महत्त्वाचे आहे.

जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।

संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीची पहिली अस्सल शुद्ध आवृत्ती लोकांपुढे आणण्याचे श्रेय संत एकनाथ महाराजांना दिले जाते. त्यामुळे मराठी भाषेचे पहिले संपादक होण्याचा मान संत एकनाथांना मिळतो.एकनाथी भागवतातील १८ हजार ८०० ओव्यांच्या माध्यमातून श्रीमद् भागवत पुराणाच्या स्कंदावर त्यांनी भाष्य केले. ज्ञानेश्वरांची विस्मृतीत गेलेली ज्ञानेश्वर महाराजांची समाधी एकनाथांनी शोधून काढली आणि समाधीचा चौथरा आणि गाभारा बांधला. आळंदीची वारी पुन्हा सुरू केली. नाथांची लेखणी लोकोद्धारासाठीच झिजली, तळमळली, तळपलीही. त्यांनी भारुडे, अभंगाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मुलन, जातीयतेच्या विरोधात कार्य केले. केवळ उपदेश केला नाही, तर आपल्या कृतीतून दाखवूनही दिले. डोळस आणि कृतीशील समाज निर्मितीसाठी प्रयत्न केले.

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।

या संत संप्रदायाचे शिरोमणी संत तुकारामांबद्दल तर काय सांगावे. त्यांनी तर लोकोद्धारासाठी देवाच्या दारात दंगाच मांडला. निष्क्रियतेवर, अंधश्रद्धेवर कोरडे ओढले. अणुरेणियां थोकडा तुका आकाशा एवढा होऊन राहिला.

ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनी म्हणती साधू ।

अंगा लाउनिया राख ।डोळेझाकुनी करती पाप ।

दावूनी वैराग्याची कळा । भोगी विषयांचा सोहळा ।

तुका म्हणे सांगों किती । जळो तयांची संगती ।

तुकारामांनी वाईट प्रथेवर आणि अंधश्रद्धेवर टीका करताना काही हाताचे राखिले नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म मानला. भेदाभेदभ्रम अमंगळ हे ठासून सांगितले. संतांनी समाजाच्या दुःखाला आणि वेदनेला आपल्या साहित्यातून आणि कार्यातून वाचा फोडली. म्हणूनच तर सुरेश भट म्हणून गेले

“माझिया गीतात वेडे दु:ख संतांचे भिनावे; वाळल्या वेलीस माझ्या अमॄताचे फूल यावे !”

बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।।

तुकोबांच्या शिष्या असलेल्या व ज्यांना तुकोबांचा प्रत्यक्ष सहभाग लाभला त्या संत बहिणाबाई या इमारतीवरील पताका म्हणजेच ध्वज झाल्या .

संतांना जातीपातीच्या चौकटीत बसवणे हे केवळ क्षुद्रपणाचे आहे. नव्हे हा त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या विचारांचा अपमान आहे. या संतांच्या मांदियाळीत तुका वाणी होता, संन्याशाच पोर म्हणून हिणवलेला ज्ञानोबा होता, गोरा कुंभार होता, सावता माळी होता, चोखोबाराय , नरहरी महाराज , जनाबाई , मुक्ताबाई , निवृत्तीनाथ , सोपानकाका , सोयराबाई असे अनेक लोक होते. वारकरी पंथ हा सर्वसमावेशक आहे. उदार आहे. म्हणूनच तो आधुनिक काळातही लोकांना अध्यात्माचा, प्रेमाचा आणि माणुसकीचा मार्ग दाखवणाऱ्या दीपमाळेसारखा तेवत आहे.