आणि मी सायकल चालवायला शिकले!

मला आयुष्यात तीन गोष्टी जमतील असं कधीच वाटलं नव्हतं.

१. नाच.

२. दोरीच्या उड्या

३. सायकल चालवणे.

पैकी दोरीच्या उड्या आणि सायकल चालवायला मी शिकले. नाच अजूनही जमत नाही. (इथे टाळी तालात वाजत नाही. हात आणि पाय एकत्र तालात टाकंण अशक्यच आहे. दोरीच्या उड्यांची कथा नंतर कधीतरी.)

पण सायकल चालवायला शिकले.

मी तिसरीत होते आणि माझा भाऊराया पहिलीत होता. तो खूप हट्टी आणि आडदांड होता. त्याने बाबांकडे सायकलीसाठी हट्ट केला. शेवटी बाबानी त्याला लहान मुलांसाठी असते तशी सायकल आणून दिली आणि त्याला सांगितलं, कि ताईलासुद्धा सायकल चालवायला द्यायची. 

माझ्या लाडक्या बंधूराजाने नेहमीप्रमाणे बाबांचे शब्द कानामागे टाकले. आणि सायकल चालवायला सुरवात केली. जेमतेम एक दोन वेळा आईबाबा बघत असताना त्याने मला सायकल दिली. आणि एकदोन राउंड मारून झाल्याझाल्या मला खेळायचं आहे म्हणून गळा काढला. मलाही फार काही खेळाची आवड नव्हतीच. आईबाबा जबरदस्ती करायचे म्हणून मी खेळायचे. उर्वरित वेळात हा मला मागच्या कॅरिअर सीट वर बसवून गल्लीभर फिरवायचा. लगेच दोन तीन दिवसात त्याने सायकलचे ट्रेनिंग व्हील्स सुद्धा काढून टाकले.(मी नको म्हणत असताना देखील.)आणि तो स्वतःच चालवायला शिकला. मग तर मी सायकल चालवायची आशाच सुटली. मला खरचटण्याची, पडण्याची खूप भीती वाटे. मग मी त्याच्या मागच्या सीटवर बसण्यातच धन्यता मानू लागले.

एके दिवशी बाबानी हा प्रकार बघितला आणि माझ्या भावाला ओरडले.

“तू ताईला अजिबात सायकल चालवू देत नाहीस. असं कास करू शकतोस तू!” – इति बाबा.

“पण बाबा, तिला चालवतात येत नाही सायकल. मग देऊन काय फायदा.”- माझे प्रिय बंधुराज.

“ते काही नाही. तिला सायकल आलीच पाहिजे.”

मग बाबा लागले मागे. मला म्हणाले, “मी तुला पडू देणार नाही. मी पकडलय, तू चालव सायकल. कशी शिकत नाहीस तेच बघतो.”

मी खूप नाटक केली. पण काय शेवटी चालवायला लागली सायकल. आणि मधेच कधीतरी बाबानी सोडून दिली ना सायकल. मला कळलं नाही आधी.पण थोडं पुढे जाऊन मी पडले. मग काय. भोकाड पसरलं. पण जरा अंदाज पण आला होता, कि जर मी इतकं अंतर जाऊ शकते तर अजून थोडं अंतर नक्कीच जाऊ शकते. मग मी उठले, आणि मग परत बाबांची मदत घेतली. आणि थोडा थोडा सराव चालू ठेवला. दोन दिवसांनी शिकले सायकल. पण तरीही माझा भाऊ मला सायकल फारशी चालवू देत तसेच. तो खूप उत्कृष्ट सायकल चालवायला शिकला. तो हात सोडून सायकल चालावे, मागे करिअरवर बसून सायकल चालावे, उलट बसून सायकल चालावे.सायकल चालवताना तो चक्क त्याच्या सीटवर उभा राही. अशा नाना करामती करत असे. आणि तो सायकल एवढ्या वेगाने आणि उत्साहाने चालवायचा जस काही विमान चालवतोय. आज तो बाईकसुद्धा खूप वेगाने चालवतो.

मी मात्र सायकल फक्त कामापुरती चालवायला शिकले.

असो. पिताश्रींची कृपा. नाहीतर माझा घाबरटपणा आणि माझ्या भावाचा हट्टीपणा दोन्हीचा सुरेख मेळ जमून, आयुष्यात कधीच सायकल चालवायला शिकले नसते.