शस्त्रक्रिया

डिसेंबर २०१३ ची गोष्ट आहे.मी एकवीस वर्षांची असेन. माझी इंजिनीरिंगची ७ व्या सत्राची परीक्षा संपली होती. आम्ही खूप दिवसानी फॅमिली ट्रिप प्लॅन केली होती. आम्ही दिल्ली, आग्रा आणि मथुरेला जाणार होतो. पंचवीस डिसेंबर ते दोन जानेवारी पर्यंतचा प्लॅन होता. सतरा डिसेंबर ला माझी सुटी सुरु झाली.

सुटीमध्ये मी आणि माझ्या मैत्रिणीने सिद्धिविनायकच्या दर्शन जाण्याचा प्लॅन केला होता. (रिझल्टच्या भीतीमुळे नाही. पण ती एक जागा होती जिकडे जायला माझ्या मैत्रिणीची आई विरोध करत नसे म्हणून.) नंतर मग आम्ही दादरमध्ये फिरून शॉपिंग करणार होतो. आम्ही आम्ही सिद्धिविनायकाला जाणार होतो वीस तारखेला. आणि साधारण एकोणीस तारखेला माझ्या पोटात दुखू लागलं. ऍसिडिटी असेल म्हणून मी एक गोळी घेतली आणि दुर्लक्ष केलं. पण वीस तारखेला पहाटे चार वाजता मला जाग आली. माझ्या पोटात प्रचंड दुखत होत. मी अजून एक गोळी घेतली आणि कशीबशी झोपले. सकाळी उठले तेव्हाही पोटात दुखत होत. पण मला फिरायला प्रचंड आवडत. आणि म्हणून पोटात दुखण्याकडे दुर्लक्ष करून मी माझ्या मैत्रिणीसोबत फिरायला गेले. दिवसभर फिरले. बाहेरच खाल्लं. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतलं. प्रसाद घेतला. पूर्ण दिवस पोटात दुखत होत. पण बाहेर फिरण्याच्या नादात विसरून गेले. घरी गेले आणि एक ऍसिडिटीची गोळी घेतली. ती रात्र सुद्धा मी जवळपास तळमळून काढली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला पासपोर्टच्या पोलीस वेरिफिकेशन प्रोसेससाठी पोलीस स्टेशनला जायचं होत. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला मी तिकडे गेले. आमच्या पोलीस स्टेशनवाल्यानी एक नागरिक जागरूकता अभियान सुरु केलं होत. त्यात ते पासपोर्ट वेरिफिकेशनसाठी आलेल्या लोकांना गोळा करून स्वसंरक्षणाबद्दल, डिजिटल फ्रॉडबद्दल माहिती देत. जवळपास तासभर! मग काय.मी तळमळत उभी होते तिकडे. सगळं काम आटोपायला जवळपास दीड तास लागला. सरतेशेवटी सगळं प्रकरण आटोपलं. आणि मी घरी निघाले. माझ्या घरापासून पोलीस स्टेशन फक्त पंधरा मिनिटावर होत. आणि मला अजिबात चालायला जमत नव्हतं. मी अक्षरशः एक एक पाय मोजत घरी आले. ऑटो केली असती पण निघताना घाई मध्ये पैशांचं पाकीट घरीच विसरले होते. अक्षरशः माझी बिल्डिंग समोर दिसत होती. पण मला असं वाटत नव्हतं कि मी घरी पोचू शकेन.

मी कशीतरी घरी पोचले आणि आईला घेऊन ताबडतोब डॉक्टरकडे गेले. तिने मला तपासलं आणि सांगितलं कि अपेंडिक्सची शक्यता आहे. आणि एक दोन गोळ्या दिल्या आणि मला घरी पाठवलं. त्या गोळ्यांनी मला तात्पुरता आराम पडला. बाबानी त्यांच्या डॉक्टर मित्राशी चर्चा केली. आमची मेडिक्लेम पोलिसी होती. त्याने सांगितलं कि परत जर पोटात दुखू लागलं तर सरळ ऍडमिट करा. आणि ऑपेरेशन करा. धन्य! आमच्या नॉर्थच्या प्लॅन वर बदाबदा पाणी पडलं होत. मी खूपच हिरमुसून गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी परत पोटात दुखू लागलं. मग आमच्या घरापासून जवळच एक हॉस्पिटल होत. तिकडे ऍडमिट केलं. मस्त हॉस्पिटल होत ते. एकदम फाईव्ह स्टार. माझी स्वतंत्र रूम होती. AC होता. TV होता. डॉक्टर्स आणि नर्सेस तरुण होते. उत्साही होते. टॉयलेट एकदम स्वच्छ होत. सगळं एकदम परफेक्ट. मी मग नॉर्थचा प्लॅन विसरूनच गेले. एकतर घरी आई आणि भावांचंच टीव्हीच्या रिमोट वरून एवढं भांडण होत कि माझ्या वाट्याला कधी TV यायचाच नाही. इथे माझी चंगळ झाली. पूर्ण वेळ रिमोट माझ्या हातात. घरातले दोन वेळा येऊन भेऊं जायचे तेवढंच. आणि ऍडमिट केल्यावर माझं पोटात दुखंण कमीच होऊन गेलं. कारण औषध सुरु झाली. डॉक्टर येऊन मला विचारायचे, “कशी आहेस?” “एकदम झकास”- इति मी! (सवयीने. अर्थातच!) “एवढी झकास आहेस तर हॉस्पिटलमध्ये काय करतेयस. घरी जा ना.”- इति डॉक्टर. 🤦 आता मी काहीतरी उत्तर दिल असत याला सुद्धा. पण मी स्वतःला आवरलं. उगीच इंजेकशन टोचायचे मला!

फक्त एक वाईट गोष्ट होती ती म्हणजे हॉस्पिटलचा युनिफॉर्म. तो एकदम आजारी असल्याचं फीलिंग देतो. या एवढ्या सुंदर हॉस्पिटलमधली सोनोग्राफीची मशीन बिघडली होती. म्हणून मला सोनोग्राफी करून घेण्यासाठी माझा भाऊ चक्क त्याच्या आर वन फाईव्ह बाईकवर बसवून सोनोग्राफी सेंटर मध्ये घेऊन गेला. ज्या बाईकवर लोक लेदर जॅकेट घालून बसतात त्या स्पोर्ट्स बाईकवर मी चक्क हॉस्पिटलच्या कपड्यात बसले होते. 🤦

वाटेत खूप सारे सिग्नल होते. माझ्या हातात I.V. होती. मी हॉस्पिटलच्या कपड्यात होते. प्रत्येक सिग्नलवर लोक माझ्याकडे रोखून बघत. त्यांना सगळ्यांना मी हॉस्पिटलमधून पळून आलेय असच वाटत असणार नक्की. 🤦

सोनोग्राफी सेंटरवाल्या बाई चांगल्या होत्या. त्या म्हणाल्या, “तुझ्या अपेंडिक्सला सूज आल्यासारखं वाटत नाहीय. हायपर ऍसिडिटी चा हा परिणाम असावा.” माझ्या रिपोर्ट मध्ये पण तेच लिहिलं होत. (माझी खात्री आहे कि माझं ऑपेरेशन उगीचच झालं आहे.🤦 मेडिक्लेमचे पैसे मिळतात म्हणून.असो. )

नंतर दोन दिवसांनी ऑपेरेशन होत. मला ऍडमिट झाल्यापासून ते काही खायला तर देतच नव्हते. त्या दोन दिवसात पाणीसुद्धा दिल नाही. सलाईन तर सुरु होत. पण घसा कोरडा पडायचा. पण मी मजेतच होते. अज्ञानातलं सुख म्हणा. तेव्हा गुगल वापरून स्वतःच निदान स्वतः करायची वाईट सवय लागली नव्हती. ऑपेरेशनमधले धोके माहित नव्हते. अँपेंडिक्सचं ऑपेरेशन काय विशेष असणार! डॉक्टर दिवसाला चार करत असतील! असा विचार माझ्या डोक्यात. दरम्यान माझी मैत्रीण आणि तिचा बॉयफ्रेंड येऊन भेटून गेले. मला आजारी असताना कोणाला भेटावसं वाटत नाही. कारण लोकांना मी नेहमी प्रसन्न दिसले पाहिजे असं मला तरी वाटत. नॉर्थला जायचं म्हणून मी नुकताच फेशियल केलं होत. त्यामुळे चेहरा चमकत होता. पण हॉस्पिटलचे कपडे सगळी रया घालवतात. म्हणून मग सांगितलं सगळ्यांना कि आता काय भेटायला येऊ नका. मी घरी गेल्यावर या भेटायला.

ऑपेरेशनच्या दिवशीपण मी एवढी निवांत होते कि मला डॉक्टरने विचारलं कि तू काय मेडिकल स्टुडन्ट आहेस का? तुला भीती नाही वाटत का? तर मी म्हटलं नाही. मी इंजिनीरिंग स्टुडन्ट आहे. आणि मला नाही वाटत भीती. ऑपेरेशन थिएटरमध्ये तुम्हाला त्या चाकाच्या खुर्चीत बसवून नेतात. मी म्हटलं मी चालू शकते. मला याची गरज नाहीय. पण त्यांनी काही ऐकलं नाही. मग मला त्या खुर्चीत बसूनच जावं लागलं. तस तर एरवी मजा आली असती. असं कोणी ढकलत नेल्यावर. मी आणि माझा भाऊ हा खेळ खेळायचो लहानपणी. पण तेव्हा नाही आवडलं हे. असो. मग डॉक्टरने मला भूल दिली. संध्याकाळी साडेआठला वगैरे ऑपेरेशन संपलं. ऑपेरेशन संपेपर्यंत आईबाबा होते. मग मला बाहेर आणलं. मी अर्धवट ग्लानीत असेन. मला कळलं आई बाबा आहेत ते. पण मग मला झोप लागली असावी. ICU मध्ये होते ती रात्र. रात्री एकदीड वाजता मला जाग आली. तर एक मेल नर्स (ब्रदर) माझं temperature चेक करत होता. मी त्याला विचारलं कि आईबाबा कुठे गेलेत, तर तो म्हणाला, आईबाबाना डॉक्टर म्हणाले कि तुम्ही घरी जाऊ शकता, म्हणून ते गेले घरी. धन्य माझे मातोश्री पिताश्री! ते पण अतिकाळजी करत नाहीत. (काळजी घेतात. पण काळजी करत नाहीत.)

दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता आले मला बघायला. मी जरा चिडलेच होते. एकतर माझा फोन पण माझ्याकडे नव्हता. कारण मी ग्लानीत असल्यामुळे फोनकडे कोण लक्ष देणार म्हणून आईबाबा फोन घेऊन गेले होते. आणि यांनी मला भेटायला यायला एव्हढा उशीर केला. आणि मी कारण विचारलं तर म्हणे, “आम्ही सकाळी चारलाच उठून बसलोय. पण तुला शुद्ध आली नसली तर आम्ही येऊन काय करणार म्हणून आलो नाही.” (हे दोघे सकाळी उठून मच्छर मारायच्या बॅटने शब्दशः माशा मारत बसले होते. 😜) मग काय. मला हसायला आलं.

मग एकदाच त्या दिवशी दुपारी मला जेवायला दिल! आणि मला सांगितलं तुला राहायचं तेवढे दिवस राहा इथे. आपली पोलिसी सगळा खर्च कव्हर करते. मग काय. पुढचे चारपाच दिवस होते मी तिथे. तिथे जास्त पेशन्ट्स पण नव्हते. सो नर्सेस बऱ्याचदा एवढ्या फ्री असायच्या कि माझ्यासोबत येऊन गप्पा मारायच्या. डॉक्टर येऊन टाईमपास करून जायचे. त्या डॉक्टर्सनी मला फेसबुकवर सुद्धा ऍड केलं. अजूनही मध्येमध्ये बोलणं होत. दिवाळी दसऱ्याच्या शुभेच्छा येतात. मी आजारी माणसासारखं वागतच नव्हते ना. मग रोज रोज तेच तेच आजारी चेहरे पाहून कन्टाळालेल्या डॉक्टर्स लोकांना माझ्यासोबत वेळ घालवायला मजा यायची. शेवटी मला माझ्या रूमची आठवण यायला लागली. माझा बेड आठवायला लागला. मग मी डिस्चार्ज मागितला. आणि घरी आले.

एकंदरीत थोडा प्रॉब्लेम वगळता, मी फाईव्हस्टार हॉटेलमध्ये एकटी राहून आल्याची फिलिंग आली होती.