विशाखा. कुसुमाग्रजांचा हा कवितासंग्रह ज्याला वि स खांडेकरांची प्रस्तावना मिळाली आहे. खांडेकरांनी त्या कवितासंग्रहाला रत्नहाराची उपमा दिली आहे. मला त्या काव्यसंग्रहात सर्वाधिक भावलेली गोष्ट म्हणजे विषयांची विविधता. प्रेम, दुःख, शौर्य, माणसाचे क्रौर्य, माणसाची विजिगीषा, निसर्गसौंदर्य, कुसुमाग्रजांनी सर्वच विषय अशा काही ताकदीने मांडले कि बाकी सर्वांच्या कविता म्हणजे “पांढऱ्यावर काळे” करत बसण्याचा प्रकार वाटावा.
“किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी,
काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी”
अशा सारख्या ओळी बालकवींच्या “अरुण” कवितेसोबत स्पर्धा करणाऱ्या वाटतात. बालकवींवर सुद्धा या पुस्तकात खूप सुंदर कविता आहे, बालकवींना कुसुमाग्रज “अमर विहंगम गगनाचा रहिवासी” असे म्हणतात. खरंच बालकवींच्या प्रतिभेला कवितेत मुजरा करायचा अधिकारसुद्धा कुसुमाग्रजांच्याच प्रतिभेमध्ये आहे.
“कधी सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात,
क्षितीजाच्या पार उभे ते दिवसाचे दूत”,
प्रेयसीच्या हातांना चांदण्याची उपमा देणाऱ्या कुसुमाग्रजांना कर्तव्याची हाक सुद्धा ऐकू येत होती. म्हणूनच ते प्रेमाला
“होते म्हणू वेड रात्र राहिलेले,
होते म्हणू स्वप्न एक रात्र पाहिलेले”
असं म्हणू शकले. प्रेमाची दिव्यता आणि भव्यता त्यांना दिसत होती, आणि कर्तव्य कधीकधी प्रेमाला हतबल करत याची जाणीवही होती. त्यांच्या कवितेतील सूर्यावर वेड्यासारखं प्रेम करणारी पृथ्वी म्हणते
“युगामागुनी चालली युगेही,
किती करावी भास्करा वंचना,
कितीकाळ कक्षेत धावू तुझ्या मी,
कितीदा करू प्रीतीची याचना”
आणि तिला माहित आहे कि त्यांचं मीलन शक्य नाही पण म्हणून म्हणून ती येरागबाळ्याला छातीशी धरणारी नाही. तीच प्रेम दिव्य आहे आणि केवळ सूर्यच तिच्या प्रेमाला लायक आहे म्हणून तो म्हणते,
“परी भव्य ते तेज पाहून पुजून,
घेऊ गळ्याशी कसे काजवे,
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा,
तुझी दुरात त्याहूनि साहवे”
मातीची दर्पोक्ती या मध्ये माती म्हणते, तिला तुमचे ताजमहाल पाहून हसू येत, शेकडो ताजमहाल जिथे शोभले ती प्रचंड नगरे जमिनीने गिळली आहेत. रमणीच रूप, विद्वान लोकांची विद्वत्ता आणि वीरांचा शौर्य या सर्वाना मातीतच जायचं आहे. त्याही पुढे जाऊन माती देवालाही आव्हान देते,
“हि क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण
बेताल नाचवी सूत्रधार हा कोण,
मातीतच अंती त्याचेही निर्वाण?
स्वामित्व जगाचे अखेर अमुच्या हाती,
मातीवर चढणे एक नवा थर अंती “
त्यांच्या कवितेत गरिबांवर होणारा अन्याय समोर येतो आणि श्रीमंतांचा मुर्दाडपणाही दिसतो.
त्यांच्या आगगाडी आणि जमीन या कवितेत “आहे रे” आणि “नाही रे” गटातला संघर्ष समोर आला आहे.
“पोलादी टाचा या छातीत रोवून अशीच चेंदत धावेन धावेन “
अशी उद्दामपणा म्हणणारी आगगाडी म्हणजे कामगारांची पिळवणूक करणारा भांडवलदार वर्ग आणि त्याला उलथून दरीत कोसळवण्याच सामर्थ्य असणारा मजूर वर्ग. हा भांडवलदार वर्गाला दिलेला इशाराच आहे.
त्यांच्या सहानुभूती या कवितेमध्ये एक चार दिवसांचा उपाशी “नयन थरथरती थिजले हातपाय” असा एक गरीब भिकारी कोपऱ्यात अभंग गुणगुणत उभा आहे, त्याची कीव मात्र कुणालाच येत नाही. त्याच्या पसरल्या हाताकडे बघून उपहास करून लोक निघून जातात. बाहेरच्या अंधाराने त्याच्या काळजात प्रवेश केला आहे अशा वेळी एक मजूर दिवसभर राबून घरी परत चालला आहे. तो त्या भिकाऱ्याला बघतो. तो म्हणतो, “राहीन मी एक दिन उपाशी, परी लाभू दे दोन घास यासी” आणि “खिसा ओतुनी त्या रित्या ओंजळीत, चालू लागे तो दीनबंधू वाट” त्याच वेळी, “धनिकांची वाहने जात होती आपुल्याच मदात”
लिलाव या कवितेमध्ये एक सावकार एका गरीब शेतकऱ्याच्या घरादाराचा लिलाव करत असतो. एकेक वस्तू विकली जाते. काहीच विकायला शिल्लक राहत नाही. त्या शेतकऱ्याचं भुकेने कासावीस झालेलं अर्भक रडू लागत, त्याची आई त्याला पाजण्यासाठी जवळ घेते आणि
“ऊर उघडे ते तिचे न्याहळोनी
थोर थैलीतिल वाजवीत नाणी
“आणि ही रे !” पुसतसे सावकार,
उडे हास्याचा चहुकडे विखार”
गरिबाला लाज सुद्धा परवडू नये हि माणुसकीची केवढी मोठी हार आहे.”तीस कोटी दैवतांच्या की दयेचे हे मढे !” हो! तेच असावे हे! कुसुमाग्रज फक्त थर्मामीटर दाखवतात आणि ताप आपल्याला चढतो.
जालियनवाला बाग या कवितेत “प्रेम दया अन क्षमा यात वसतो परमेश” असं सांगणाऱ्या धर्माच्या लोकांनी केलेले भीषण कृत्य पाहून प्रभुने नयन झाकले असतील असं कवी म्हणतात. “कि हि सैतानाची प्रभूवर मात आहे?” ह्या जखमेने तरी प्रभूच्या काळजात नवीन येशू जन्माला का असा प्रश्न कवी विचारतात.
त्यांच्या कवितेत निसर्गसुद्धा येतो पण तो निसर्गातला संघर्ष आणि त्याच रौद्र रूप घेऊन.
ग्रीष्माची चाहूल कवीला लागते आणि कवी म्हणतात,
“सरेल किंवा वसन्त म्हणुनी
सुकतिल कुसुमाकुल पुष्करणी
करपुनि जाइल अवघी धरणी
ती आंच अगोदर भासतसे !
हें काय अनामिक आर्त पिसें !”
त्यांच्या कवितेत निसर्ग भव्य आणि सुंदर आहे पण त्यात एक उदासीनता आहे.
“जमूं लागलेले दंव
गवताच्या पातीवर
भासतें भू तारकांच्या
आसवांनीं ओलसर.”
कवीला गवताच्या पातीवरच दव मोत्यांप्रमाणे भासत नाही तर तारकांच्या अश्रू प्रमाणे वाटतं. पाऊस सुद्धा येतो तो वादळलेला जीवनसागर अन अवसेची रात घेऊन. नुसता बर्फ पडत नाही तर संपूर्ण हिमलाट येते.
“हळुहळु खळबळ करीत लाटा
येउनि पुळणीवर ओसरती
जणूं जगाची जीवन-स्वप्ने
स्फुरती, फुलती, फुटती, विरती !”
समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा कवीला जगाची आणि जगातील लोकांची स्वप्ने वाटतात, जन्मणारी, फुलणारी आणि अर्थातच मरणारी .
एका कवितेत शुक्रतारा सुद्धा स्नेहहीन ज्योतीसारखा वाटतो. कवीच व्याकुळपण अनेक कवितांमधून समोर येत. आहे मनोहर तरी, हे उदास गमण का असेल,
“नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुल केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात !”
कदाचित हि बेगडी झगमगाटापेक्षा कवीला असलेली शाश्वत अशा निरागस खऱ्या सौंदर्याची ओढ आहे. नवलाख दीपांची अंतराळातील प्रभा पाहून न विचलित होणार कवीच हृदय माजघरातील मंद दिव्याच्या वातीच्या स्मरणाने व्याकुळ होत.
“ध्येय, प्रेम, आशा यांची
होतसे का कधीं पूर्ती?
वेड्यापरी पूजतों या
आम्ही भंगणार्या मूर्ती”
एकीकडे हा पराकोटीचा निराशावाद! ध्येय प्रेम आशा यांना भांगणाऱ्या मूर्ती मानणं ! आणि दुसरीकडे
“अनंत आमुची ध्येयासक्ती
अनंत अन आशा ,
किनारा तुला पामराला “
असं म्हणणारे कुसुमाग्रज.
“मार्ग ना आमुचा रोधू शकती ना धन, ना दारा
घराची वा वितभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात
जिंकुनी खंड खंड सारा ! “
असं म्हणण्याची विजिगीषा असणारे कुसुमाग्रज. मानवतेवरचा प्रचंड विश्वास असणारे कुसुमाग्रज.
“क्रुद्ध भूक पोटात घालु द्या खुशाल थैमान
कुरतडु द्या आतडी करु द्या रक्ताचे पान
संहारक काली, तुज देती बळीच आव्हान
बलशाली मरणाहुन आहे अमुचा अभिमान
मृत्युंजय आम्ही, आम्हाला कसले कारागार ?”
भूक लागली तर आतडे कुरतडून रक्ताचे पान करण्याची तयारी असणारे क्रन्तिकारक, संहारक कालीमातेला आव्हान देणारे, मरणाहून बलशाली अभिमान असणारे मृत्युंजय, हे कुसुमाग्रजांना प्रभावित करतात.
“कशास आई, भिजविसि डोळे उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल”
रात्रीच्या काळोख्या गर्भातूनच स्वातंत्र्याचा उषःकाल होईल असा एक दुर्दम्य आशावाद आहे.
कुसुमाग्रजांच्या कवितांना अग्निसंप्रदायी कविता म्हणतात. ही काऊ चिऊची कविता नव्हे. मी एक मुंगी तू एक मुंगी करणारी कविता नाही. त्या काळातील समाजाचं चित्रण करणारी (जे दुर्दैवाने आजच्या समाजालाही थोड्या फार फरकाने लागू पडत) कविता आहे. समाजासमोर आरसा धरणारी कविता आहे. समाजाचं दुःख सांगणारी आणि ते दूर होईल असा आशावाद सांगणारी ही कविता आहे.