कवींची समाजाला नेमकी गरज काय?

ज्या देशात तत्वज्ञान सुद्धा “गीतेचं” रूप घेऊन येतं तिथे हा प्रश्न कोणाला पडू नये खरं तर.

अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण त्या तेवढ्याच गरजा नाहीत.

ज्या दिवशी “कशासाठी पोटासाठीचा” प्रश्न माणसाने सोडवला त्या दिवशी “खंडाळ्याच्या घाटासाठीचा ” प्रवास माणसाने सुरु केला.

खंडाळ्याचा घाट म्हणजे जीवनातील सौंदर्य.

ते जीवनाला प्राप्त करून देते ती कला!

मग ती चित्राच्या स्वरूपात व्यक्त होईल, अभिनयाच्या स्वरूपात, लेखाच्या स्वरूपात किंवा मग एखाद्या गाण्याच्या स्वरूपात….

माणसाच्या जीवनाची विभिन्न अंग समर्थपणे व्यक्त करते कला.

आणि कविता हे कलेचं शब्द रूप.

भारत हा कवींचा देश आहे. आमचे रामायण आणि महाभारत यांसारखे आद्यग्रंथ ही खरेतर महाकाव्ये आहेत. आमचे वेद हे कवितेच्या रूपात आहेत.

पूर्वी घरात चूल आणि मूल सांभाळणाऱ्या बायकांनी ओव्यांमध्ये आपली दुखणीखुपणी गुंफून त्यांना वाट मोकळी करून दिली.

कवितांमध्ये सामर्थ्य असत. वंदे मातरम ही कविता लिहिली जाते आणि ती स्वातंत्र्य समराची प्रेरणा ठरते. ” गर्जा जयजयकार क्रांतीचा ” या सारखी कविता लोकांना मंत्रस्वरूप ठरते. जगण्याचं ध्येय देते.

” We shall overcome some day ” या सारखी कविता नागरी हक्काच्या लढ्यासाठी लोकांना प्रेरित करते.

एखादा तुकाराम येतो आणि भेदभेद अमंगळ सांगतो.

एखादा रामदास चळवळीचं सामर्थ्य सांगतो आणि मराठा तितुका मेळवावा सांगतो. आणि लोक ते ऐकतात!

आपली लग्नाची मंगलाष्टक ही एक कविताच तर असते. आपल्या आयुष्यातील मंगलकार्ये कवितेच्या साक्षीने पार पडतात.

माणसाच्या आयुष्यातील आनंद, दुःख, प्रेम, त्याग या सगळ्याला शब्दरूप देते ती कविता.

चंद्र , फुलं, तारे, वारे,

हळवे किनारे,

एकटे उसासे,

क्षणांचे पसारे. ..

गुलाबी इशारे.. .

कवितेविना

व्यर्थ सारे….

कवींनी शब्दात मांडलं,

तो आकाशातला चंद्र एवढा सुंदर का आहे. .. ढगाआड लपूनही तो एवढा गोड का.. आणि त्या चन्द्राच्या साक्षीने फुलणारे प्रेम हे एवढे पवित्र का… त्या चंद्रात आणि तुमच्या प्रियतमेच्या चेहऱ्यात एवढे साम्य का आहे .

कवींनी शब्दात मांडलं…..

कि प्रेम हे एवढे सुंदर का आहे. .. आणि एवढे भीषण का आहे….

पाऊस एवढा हवासा का… आणि नकोसा का आहे. ..

फुलांचाही पसारा का होऊ शकतो .. आणि पावसाळ्यात दारातल्या सायलीच्या वेलीची एवढी काळजी का लागून राहते. ..

आई नसण्याचं दुःख आणि तिच्या असण्याने गजबजलेलं आपलं गाव…

कधी कधी एकटेपणा एवढा घेरून का येतो… आणि कधी तोच इतका आपलासा का वाटतो.. .

अंधारून येणार असलं तरी सूर्यास्त एवढे सुंदर का असतात. ..

कवींनीच तर सांगितलं हे….

कवितांनी कधी धीर दिला, कधी न संपणारा आक्रोश दिला.. कधी फुलं दाखवली तर कधी फुलाखालचे काटे दाखवले. .. कधी शृंगार दिला कधी वैराग्याचा महिमा सांगितला. कधी रात्र खरी म्हटली कधी दिवस खरा म्हटलं… कधी हुरहूर दिली तर कधी मनःशांती दिली…

माणसाचं जगणं समृद्ध करते कविता. ..

म्हणूनच बहुधा केशवसुत कवींबद्दल म्हणतात

आम्हांला वगळा – गतप्रभ झणी होतील तारांगणे;

आम्हांला वगळा – विकेल कवडीमोलावरी हे जिणे!