तुझ्या केसांच्या अल्लड बटेत
तुझ्या ओठांच्या नाजूक महिरपीत
तुझ्या डोळ्यातील अविरत चांदण्यात
तुझ्या निमुळत्या बोटांच्या रेखीव नाचात
तुझ्या वक्षांच्या लाडिक वळणात
तुझ्या पैंजणांच्या अविरत तालात
जीव अडकलाय माझा
पण त्याहून आहे लोभस
तुझ्या हास्यातील निरागस गाणं
तुझ्या मनातील शांती आणि निरामयता
तुझ्या शब्दातील आत्मविश्वास
तुझ्या वागण्यातील गूढ अलिप्तता
अन तरीही तुझ्या मनातील न संपणारं
अस्ताव्यस्त प्रेम….
जेव्हा तू तुझ्या ओढणीशी चाळा करतेस
तेव्हा खरंच हेवा वाटतो मला तिचा.
तुझी ओढणी बनून मला तुला लपेटून रहावस वाटत.
नाहीतर वाटत, कधी तुझ्या गजऱ्यातलं एक फुल मी व्हावं
तुझ्या केसांच्या धुंद सुगंधात मी स्वतःला हरवून जावं
प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या अट्टाहासात तुझी होणारी ओढाताण
मला नाही ग बघवत…
मग मी करू पाहतो काही मदत तुला..
अन वाढवून ठेवतो गोंधळ सारा..
तेव्हा आधी तू चिडतेस..
आणि मग माझ्या वेंधळेपणाला हसून मला जवळ घेतेस
तेव्हा असं वाटत ना..
की हा क्षण संपू नये…
अमर व्हावा हा क्षण माझ्या मनात..
पावसाच्या धारा हातांवर झेलत तू खिडकीत उभी राहतेस
आणि आजूबाजूचं जग विसरून खोल खोल आत बुडत जातेस..
तुझं आणि पाण्याचं असं नातं
माझ्या आणि तुझ्या नात्याहूनही अधिक प्रवाही
अधिक गहिरं…
का बरं ?
नव्हे सगळंच अधिक कळत तुला ….
कविता… लेख… आनंद… दुःख…. राग…
तुझं सगळं जरा अधिकच असत…
लोकांच्या वेदनांशी जुळतो तुझा सहज दुवा..
सहजच मदतीसाठी सरसावतात हात तुझे..
सहज घेतेस काळजी….
सगळ्यांचीच…
मग का विसरतेस स्वतःला..
अगदी सहज…
तू चांदणी रात आहेस…
तू आभाळाची साथ आहेस..
तू अविरत सूर आहेस…
तू प्रेमाचा पूर आहेस..
माझं स्वप्न आणि सत्यही तूच आहेस…
आणि कधीच विसरू नकोस सखे…
तू माझं संचित आहेस…
पौरुष : इथे वाचा तिच्या नजरेतून “तो”