मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले
पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी
घरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा
गात्रात कापणारा ओला फिका पिसारा
या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे
आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे
रानात एककल्ली सुनसान सांजवेळी
डोळ्यांत गलबताच्या मनमोर रम्य गावी
केसात मोकळ्या या वेटाळुनी फुलांना
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे
ही माझी सर्वात आवडती कविता उतरलीय ना धो महानोरांच्या लेखणीतून.
या कवितेत भरून राहिलाय पाऊस…
आणि पावसाचा आणि रानाचा तो सुगंध.. .
खूप ऍबस्ट्रॅक्ट शब्दचित्र आहे पावसाचं …
तरीही खूप स्पष्ट !
त्या पावसाला आणि त्या हवेला देह आहे ज्याला कवळून घेता येईल.
राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरूनी…
तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी
पाण्यामध्ये झिम्मा धरणार आस्मानी आभाळ आणि लाज पांघरून येणार चांदणं ! हे कवीने स्वतः पाहिलेलं आहे. आणि आमच्या सारख्या शहरात राहणाऱ्या लोकांना कवीने दाखवलं आहे .
कविता म्हणजे काय? तर तो असतो आपल्याच जीवनाचा आरसा.
महानोर यांचं जीवन असंच रानसोबत तादात्म्य पावलेलं वाटत.
महानोर म्हणतात “मी हिरव्या बोलीचा शब्द जाहलो”
अशी निसर्गासोबतची विलक्षण एकतानता त्याच्या आधी कदाचित फक्त बालकवींनाच साधली असेल.
त्यांचे रानात गुंतलेले प्राण जोंधळ्याला लखडलेले चांदणे पाहू शकतात ..
त्याचवेळी निसर्गाचं भयंकर रौद्र रूपही त्याच्या नजरेतून सुटत नाही. दुष्काळामुळे उदास झालेली खेडी, आंबलेली माणसे, भुकेने तडफडून मेली “कारटी”, “पाणावटल्या डोळ्यांनी गोऱ्या राजाचे महिमान गाणारी जख्ख म्हातारी आणि पासरीभर ज्वारीवर भोग देणाऱ्या रूपवंत पोरी… ” हे सगळंही महानोर तितक्याच ताकतीने मांडतात. त्या कविता वाचल्या नंतर येते एक सुन्नता… “काजळात चंद्र बुडून जावेत” तशी.. .
त्यांच्या देहधारी निसर्गामध्ये स्त्रीत्वाची अशी काही कहर विलक्षण चित्रे सापडतात! स्त्रीत्वाची उत्तानता आणि मादकता , ते स्त्रीत्वाचं सनातन आव्हान आणि तिची पुरुषावरची आणि जगावरची अपरंपार भोळीभाबडी माया यांची निसर्गदेहात आढळणारी प्रतिबिंब कवी खूप सफाईने दर्शवतात. त्या निसर्गात कवीच अस्तित्व धुरकट धुरकट होत जात… पण कवीच्या नजरेतून आपणच तो “रंगबहार” पाहू लागतो.
“आंब्याच्या झाडाला मोहोराचा वास झेपता झेपेना
गाभुळ्या चिंचेला नवतीचा भार पोटी धरवेना.. . “
म्हटलं तर हे निसर्गवर्णन आहे. पण मग पहिल्यानेच गर्भारलेली , नवतीच तेज चेहऱ्यावर मिरवणारी तरी काहीशी थकलेली आणि लिंबासारखी रसरशीत कांती असलेली स्त्री माझ्या डोळ्यासमोर का उभी राहावी…?
अशी झोपडी बोलघेवडी पांथस्थाचा पाय अडे
दाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून भूल पडे..
एक निरागस बोलकी आणि मनमोकळी स्त्री किती जबरदस्त आकर्षण निर्माण करू शकते ना? कि येणाऱ्या पाहुण्याला जाऊ नयेस वाटावं …
“हिरव्या पानात पानात काही चावळ चालते
भर ज्वानीतली ज्वार अंग मोडीत बोलते…
पोटऱ्यातल्या गव्हाचे हसू ओंब्यात दाटते
केळं कातीव रूपाची छाया पाण्यात शोधते.. . “
हे ज्वारीच आणि गव्हाचं वर्णन आहे का? हो आणि नाही सुद्धा…
आणि मग माझ्यासमोर इतकी देखणी स्त्री का उभी राहते? पट्टीच्या पुरुषार्थाला आव्हान देऊ शकेल अशी ? निर्भय… निरागस… तरी खूप स्ट्रॉंग.. .
“असा शब्द टाकू नये
डोळा रंग माखू नये…
गच्चं भरल्या रानाला
अशी गळ घालू नये…
खुळ्या , नुसताच डोळ्यांनी
रान झेलू जाऊ नये… “
या शब्दातील आर्जव आणि आव्हान दोन्ही तितकंच मोहक…
आणि कवितेतील निरागस प्रेम.
राजाचा चांदवा भाळी मिरवणारं..
“सये किनी ग,
तुला कसे सांगू शब्दात
साजण दिवसा अडून बसला
मीही भरात
देहावरती चळ भरलेले अवखळ हात
भर दुपार …
उघड्या रानातं..
रात फुलात
पोर झुलत ..
ती घट्ट चोळीच्या गाठी चाळवताना
आव्हान तिचे झेपेना रानफुलांना…”
असला बेभान शृंगार.. विवस्त्र निसर्ग.. आणि निसर्गात एकरूप झालेला शृंगार…
“डोळे थकून थकून गेले
पाखरासारखा येऊन जा…
रान भलतच भरात , जरा
पिकात धुडगूस घालून जा… “
इथे संकोच नाही आहे… हवं आहे ते हवं त्या शब्दात मांडताना लाजेचा पडदा आड येत नाही… स्त्रीच्या आशाआकांक्षाना आणि अपेक्षांना बंधनात जखडले नाही आहे. . ती स्त्री मुक्त आहे. ..
रानफुलासारखी … वाऱ्यासारखी… झऱ्यासारखी.. .
त्यांच्या कवितेतल्या रानालाही भावभावना आहेत… कथा आहेत.. . दुःख आहेत. .. माज सुद्धा आहे…
“पानात चांद धुमसतात
झाडे झिंगून जातात…
पिवळ्या बांबूच्या गीतगंगेत
पक्षी बुडून जातात… “
असं काहीस स्वमग्न रान मला त्यांच्या कवितेतून दिसत.. .
“झाडीत हूल बिथरते… गंध विखरते…
फुलांची नक्षी..
गर्दीत हरवली वाट.. कुणी सन्नाट …
बावरा पक्षी.. “
तंद्रीत आणि उन्मनी अवस्थेतल हे एक रानाच शब्द चित्र…
ना धो महानोरांच्या कविता म्हणजे चित्र आहेत.
काहीशी ऍबस्ट्रॅक्ट..
अर्थ कळतोही आणि नाहीसुद्धा..
त्यांच्या शब्दांना सुगंध आहे आणि त्यांच्या कवितेत प्राण आहे..
जर कधी उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघायची असतील आणि हरवून जायचं असेल तर महानोरांची कोणतीही कविता वाचा..