क्षण

चुकत चुकत जातो रस्ता
वाटेवरती अवघड ठेचा
हवं हवंस हरवत जात
नको ते गवसत जात
त्याचीही मग सवय होते
दुःख अलगद विरत जाते
बनती काही नवीन नाती
रिक्त जागा भरण्यासाठी
सापडती काही नवी फुले
ज्यांच्यासोबत मन जुळे
उन्हात कधी सापडे पाणी
वारा कधी गातो गाणी
प्रेमाची ती नजर हवी
जगण्याची ती नशा हवी
काही क्षणात भेटे आभाळ
काही क्षणात होते सकाळ
तोच क्षण आहे खरा
तोच क्षण मुठीत धरा

– मधुराणी