फिर्याद

तो चांद माझा वैरी
हसे खिडकीमधून
व्यथा माझिया मनाची
त्यास कळावी कुठून

असं टिपूर चांदणं
फुलापरी उमलावं
राजा माझा नाही घरी
कसं चांदणं झेलावं

अंधारातही सावल्या
कशा येति अंगावर
त्यांना ठाउकही नाही
माझी मेलेली नजर

चांदावानी माझा राजा
जेव्हा माघारी येईल
डोळ्यात ताऱ्यांवानी
लाख ज्योती पेटतील

जेव्हा येईल रे माझा
राजा घरी परतून
नको नजर तू लावू
खिडकीत डोकावून

-मधुराणी