प्रीतीचे ऋण

अलवार आठवणींचा सुगंध तरळत आला
राधेच्या स्कन्धावरती कृष्णाचा निळसर शेला

कृष्णाच्या नसण्याची होईना सवय तिला वेडीला
फिरूनी येईन परत सांगुनी गेला मोहन गेला

यमुनाकाठी एकटीच ती बसते वाट पाहात
शेला जाई  भिजून नकळत राधेच्या आसवात ..

विरहाचा हा दाह अनामिक सोसेना राधेस
ठरवून काही कठोर मनी ती टाके पाय पाण्यात

प्रीतही हरली, रासही सरला, उजाड वृन्दावन
सखाही माझा मला विसरला अर्थ काय जगण्यात?

अश्रूही पुसले मन बांधियले केला हा निर्धार
तितक्यात कुठूनसा घनगंभीरसा घुमला हा आवाज

दूर आहे तरीही राधे तुझ्यात गुंतले प्राण
सांभाळ स्वतःला मागे मुरारी एवढेच दान

अल्लड माझ्या सर्व स्मृतींवर तुझीच सत्ता राधे
जिथे मुरारी तिथेच राधा समीकरण हे साधे  

कर्मयोग माझ्या भाळीचा सर्व सर्व चुकवेन
थकले मस्तक टेकायला तुझ्याजवळ येईन  

घालुनिया समजूत तुझी ऐकेन त्रागा सारा
आता मात्र परत फिर,माझं ऐक ना ग राधा

साधी राधा विरघळली ती कृष्णाच्या वचनांनी
जरा हसली परत फिरली पण साश्रू नयनांनी

वाट त्याची बघता बघता जन्म राधेचा गेला…
वर्षे लोटली अनेक तरीही जपून ठेवला शेला…

परमात्मा का कधी मोडितो साधेभोळे वचन
म्हणुनी कदाचित ऋणी प्रीतीच्या पावन नारायण 

-मधुराणी