भेट

कधी वाटले द्यावे तुजला
अद्भुत काही न सरणारे
आकाशाहून गहिरे आणि
वाऱ्यासम ते झुळझुळणारे

द्यावे अनेक मोती तुजला
प्राजक्तासम दरवळणारे
कि द्यावे माझे ओठ आणि
श्वास उगीचच हुरहुरणारे

द्यावे काही हिऱ्यासारखे
शुभ्र काही ते चकाकणारे
कि देऊ अपुले गीत जुने ते
कानापाशी किलबिलणारे

ओठांवरती द्यावी खूण ती
अस्पष्ट आणि न दिसणारी
किंवा देऊ एक रात्र अन
मंदमंदशी मोहरणारी

द्यावे म्हणते काही क्षण
आठवणीतून न पुसणारे
ज्यांच्या सोबत येई हसू
डोळ्यांमधुनी लकाकणारे

-मधुराणी