हलकंफुलकं भांडण

बायको :
प्रेम करुनि लगीन केलं
चूक ही मोठी झाली ग;
एका कामाला मदत नाही
नवरा माझा आळशी ग!
चंद्र ताऱ्यांचे वचन देऊन
याने मजला पाडल फशी,
सोफ्यावरती टॉवेल टाकी
पसारा मी बाई आवरू किती!
वेळ जरासा काही मिळता
नाक्यावरती जातो ग…
कामाच्या अन नावाखाली
पबजीच खेळत बसतो ग…
बिर्याणी अन चिकण कोरमा
आणि नाही त्या फर्माईशी;
घरी मी मरमर करून सुद्धा
झोमॅटोतच याला ख़ुशी…!
लग्नाआधीचा प्रियकर माझा
नवऱ्यामध्ये गेला दडून…
रडून भांडून अन थकून गेले
प्रीत आणि मी शोधू कुठून…

नवरा :
जाणूनबुजून केलं नाही;
सवयी माझ्या जुन्याच ग!
कसे समजावू तुला मी आता
तूच माझी अन राणी ग….!
प्रियकर आहे जुनाच मी अन
मोल नसे या नात्याचं…
टॉवेल उचलेन पसारा आवरेन
घर आपुल्या दोघांचं!
तुझ्या हाताची चव नसे बघ
डॉमिनोजच्या पिझ्झ्याला…
चिडून भांडून सोडू नको तू
तुझ्या लाडक्या राजाला!
दोघांच्या या मनोमीलनी
बहर येईल प्रीतीला…
तुझ्या विना मी अधुराच ग
नसे अर्थ या जगण्याला….!

-मधुराणी