डाएट

कधी कधी येते मनात असे खूप,
करू वजन कमी सोडून देऊ तूप!
भात डाळीवरचे करू कमी प्रेम,
जोर बैठकांचा करू आता नेम!
नाश्त्याला आता नको दहीवडे,
घरी आणू चार ओटमीलचे पुडे!
माझ्या मना सज्जना नको पाहू तू वळून;
वडापावची गाडी गेली जरी जवळून!
पाणीपुरीची गा व्यर्थ मोह माया…
तिच्या नादे लागून किती वाढली काया!
चॉकलेट केक नको आता खाऊ;
आईस्क्रीमकडे नको बरे पाहू!
बंद पहा केले बाहेरचे खाणे.
बारीक होईपर्यंत उपाशी राहणे.
उठून सकाळी व्यायामही केला, पण ;
दुपारच्या पुरणपोळीने घात की हो केला !
पहिल्याच दिवशी नियम मोडला;
उपासाचा निश्चय लगेच सोडला!
वजनाची चिंता आता सोडूनिया दिली
वजनकाट्यासोबत बरी अपुली दूरी!

-मधुराणी