तुझ्या मिठीच्या उबेवरती माझा हक्क नाही

(कवी सौमित्र यांची एक अतिशय प्रसिद्ध कविता आहे. “हिच्या मिठीत तुझी उब शोधणं नाही बरं.” त्या कवितेतील प्रियकराला उद्देशून खालील कविता लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे.)

तुझ्या मिठीच्या उबेवरती माझा हक्क नाही
नाही म्हणता दिल्या तुला खोल जखमा काही

तुझ्या माझ्या जागांवर मी पुन्हा पुन्हा जाते
हरवलेले काही क्षण पुन्हा शोधू पाहते
विसर विसर विसरूनसुद्धा तुझी आठवण छळते
माझी ही व्यथा सख्या फक्त मला कळते
आई म्हणते काळासारखं दुसरं औषध नाही
तुझ्या मिठीच्या उबेवरती माझा हक्क नाही

त्यादिवशी तिच्यासोबत तुला जाताना पाहिलं
मनासोबत डोळ्यांमध्ये गच्चं काहूर दाटलं
तुझ्यासोबत माझं नसणं अजून खरं झालं
आठवणींच्या पुराने मला पुरतं वाहून नेलं
तुझ्या सोबतीचं सुख माझ्या नशिबी नाही
तुझ्या मिठीच्या उबेवरती माझा हक्क नाही

मला तू विसरलास असं काल कळलं
पहिल्यांदाच डोळ्यातून पाणी नाही गळलं
तिच्याच सोबत बांधावीस तू मनामधली घरं
नशिबापुढे झुकावं लागत एवढं मात्र खरं
तुझ्या सुखाच्या आड मी कधीच येणार नाही
तुझ्या मिठीच्या उबेवरती माझा हक्क नाही

-मधुराणी