“मी मोर्चा नेला नाही”

संदीप खरे यांची ही कविता सामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यच चित्र आहे. समाजात अनेक घटना घडत असतात. त्यांचा हा वर्ग केवळ मूक साक्षीदार असतो. पण पुलंच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘समाजाचा गाडा हा असल्याच बुळबुळीत बॉलबेअरिंगवर चालत असतो.’

मी मोर्चा नेला नाही… मी संपही केला नाही

मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही

अनेकदा अन्याय घडतो. पण त्या विरुद्ध आवाज उठवण्याची प्राज्ञा नसते. तेवढा वेळ, शक्ती, पैसा नसतो. जगण्याची भ्रांत असलेल्या माणसाला ‘न्याय’ सुद्धा परवडावा लागतो. कधीकधी जगण्याची भ्रांत संपलेली असते पण आयुष्याची बसलेली घडी विसकण्याची हिम्मत कोण करणार? म्हणूनच हा वर्ग कधी मोर्चा नेत नाही. कधी संपही करत नाही. आपल्या छोटेखानी आयुष्याला सावरत कोणाच्या अध्यात ना मध्यात असा वावरत असतो. क्रांतीचा जन्म अशा वर्गात सहसा होत नाही. क्रांती तिथे जन्मते जिथे काही गमावण्याची भीतीच मेलेली असते. असं दोन बाबतीत होऊ शकत. एकतर असे लोक गर्भश्रीमंत असतात. ज्यांनी आयुष्य पुरेपूर उपभोगलंय. किंवा जन्मते मजूर वा शेतकरी वर्गात ज्यांच्याकडे गमावण्यासाठी काही नसतंच.

भवताली संगर चाले तो विस्फारून बघताना

कुणी पोटातून चिडताना कुणी रक्ताळून लढताना

मी दगड होऊनि थिजलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा

तो मारायाला देखिल मज कुणी उचलले नाही

आजूबाजूला युद्ध भडकलेल असो व दंगली आणि जाळपोळ चालू असोत. या माणसंच आयुष्य इतक inconsequential – निरर्थक असत, कि या लोकांचा युद्धात व दंगलीत बळी गेला काय वा ना गेला काय, कोणालाही कसलाही फरक पडत नाही. कुसुमाग्रजांनी, ‘कोट्यवधी जिवाणू जगती अन मरती, जशी ती गवताची पाती’ ज्यांना म्हटलंय, ते हेच लोक.

नेमस्त झाड मी आहे, मूळ-फांद्या जिथल्या तेथे

पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने

पण पोटातून कुठलीही खजिन्याची ढोली नाही

कुणी शस्‍त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही

जंगलात काही झाड वाकडीतिकडी वाढतात. काही सरळसोट. झाडांना सुद्धा स्वतःच नशीब असत. काही झाडांना पांडवांच्या शस्त्रांच रक्षण करायची संधी मिळते. काही झाडांच्या ढोलीत खजिना लपवलेला असतो. काही झाड उंच पर्वतांच्या शिखरांवर वाढतात आणि पक्षिराज गरुड त्यावर विसावतात. पण बहुतेक झाडांच्या नशिबी मृत्यू येईपर्यंत जगत राहणं एवढच असत. पावसाळ्यात हिरवी होतात, थंडीत पानगळ सहन करतात. कसलाही विरोध न करता. त्या झाडांसारखच यांचही आयुष्य असत. विरोध करणं जमतही नाही आणि झेपतही नाही.

धुतलेला सात्त्विक सदरा, तुटलेली एकच गुंडी

टकलावर अजून रुळते अदृश्य, लांबशी शेंडी

मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो

मी मनातसुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही

समाजाला घाबरून सतत काहीतरी जपत राहणारा हा वर्ग. लोक काय म्हणतील म्हणून घाबरणारा हा वर्ग. आपणही ‘त्या’ लोकांपैकीच एक आहोत हे सहज विसरणारा वर्ग. ‘शिवाजी जन्मावा, पण तो दुसऱ्यांच्या घरी’ असं मानणारा हा वर्ग. धर्माला घाबरणारा. देवाला घाबरणारा. चिकित्सेला बुजणारा. प्रश्न विचारण्याची हिम्मत नसलेला वर्ग.

मज जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो

मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो

मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही

मी कांदा झालो नाही ! आंबाही झालो नाही

यांचं आयुष्य म्हणजे एकतर केळ किंवा भेंडी. त्यांच्यात ना आंब्याची श्रीमंती वा कांद्याची जहालता.त्यांचा वापर करताना कोणीही दुसऱ्यांदा विचार करणार नाही. असा हा वर्ग.

पण खरं सांगायचं तर हाच वर्ग समाजाचा प्रचंड मोठा भाग आहे. त्यांच्यामुळेच समाजाचा गाडा व्यवस्थित चालू असतो. क्रान्ति या वर्गाला मानवत नाही. पण हा वर्ग सतत उत्क्रांत होत असतो. आणि खरं सांगायचं तर आता कधी नव्हे तो या वर्गाला लोकशाहीमुळे प्रचंड महत्त्व प्राप्त झालं आहे. सोशल मीडियावरून हा वर्ग हळूहळू आपली मत मांडू लागला आहे. संघटित होऊ लागला आहे. जागृत होऊ लागला आहे. त्यामुळे आता –

‘खिन्न आंधळा अंधार

आता ओसरेल पार

लहरींत किरणांची

कलाबूत मोहरेल…

आतां उजाडेल !’

अशी आशा बाळगायला काही हरकत नाही.