मृत्यू निश्चित आहे हे माहित असूनही आपण जगण्यासाठी का धडपड करावी?

कुणा न माहित सजा किती ते
कोठून आलो ते नच कळते
सुटकेलाही मन घाबरते
जो आला तो रमला
जग हे बंदिशाला

गदिमांच्या या अजरामर ओळी ! भविष्यात आपल्या आयुष्यात काय घडेल किंवा घडणार नाही हे कोणीही सांगू शकत नाही. पण जन्मलेल्या जीवाचा कधीना कधीतरी मृत्यू होणार हे मात्र अटळ सत्य आहे.
मग आपण जगावं का ? कशासाठी ?
विश्वाचा प्रचंड व्याप पाहिला तर त्यात आपण अत्यंत क्षुद्र आहोत. विश्वाच्या पसाऱ्यात पृथ्वीच जरा एका धुलीकणाएवढी असेल तर त्या धूलिकणावरच आपलं अस्तित्व ते केवढं ! आपण काहीही मिळवलं वा गमावलं तरी त्याने या जगात खरंच काही फरक पडणार आहे का ?
कोणत्या त्या सत्याच्या सिद्धीस्तव साची
चक्रे फिरती विश्वाच्या या अनंत घड्याळाची

असं कुसुमाग्रजांनी म्हटलं आहे.
आपण तरीही जगण्यासाठी का धडपड करावी ?
१. जिवंत राहण्याची आदिम प्रेरणा फार आदिम आहे. बोधिसत्वांची एक गोष्ट मी फार पूर्वी वाचली होती. कुठं ते आठवत नाही. खूप सविस्तर गोष्ट लक्षात नाही. पण सारांश पुढीलप्रमाणे होता. बोधिसत्व नवा जन्म घेणार होते. आणि त्या जन्मामध्ये ते वराह रूप घेणार होते. त्यांनी आपल्या शिष्यांना स्वप्नात दृष्टांत दिला की मी नवीन जन्म वराहाचा घेणार आहे तेव्हा माझा जन्मतःच वध करा जेणेकरून मी त्या रूपातून मुक्त होईन. पण जेव्हा बोधिसत्वांचा जन्म झाला तेव्हा त्या बाल वराहाला जन्मतः मारून टाकावं ही गोष्ट शिष्यांच्या जीवावर आली. त्यांनी ठरवलं कि काही दिवसानंतर आपण बोधिसत्वांची आज्ञा पाळू. आणि काही दिवसांनी शिष्यानी खरोखर त्या वराहाच्या मारायचं ठरवलं तेव्हा बोधिसत्त्वांनी पुन्हा एकदा दृष्टांत दिला आणि सांगितलं कि आता या जीवनावर माझा लोभ जडला आहे. आता माझे आयुष्य तुम्ही संपवू नका.
माणूसच नव्हे तर जगातील प्रत्येक जीवांमध्ये जिवंत राहण्याची प्रबळ इच्छा असते. ती इच्छाच माणसाच्या किंवा कोणत्याही प्राण्याच्या किंवा एकूणच जीवसृष्टीच्या अस्तित्वाचं कारण आहे.
२.या जीवनाचा अनुभव इतर प्राण्यांपेक्षा मानवामध्ये वेगळा आहे. माणसाला बुद्धी आहे आणि भावभावना आहेत. त्यामुळे आपण जीवन सुकर करण्यासाठी माणसाने अनेक गोष्टींची निर्मिती केली आहे. या गोष्टींच्या निर्मितीमध्ये चाकाच्या शोधापासून कॉम्पुटरपर्यंत,कुटुंबव्यवस्थेपासून समाजव्यवस्थेपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. हे सर्व शोध एका व्यक्तीने लावलेले नाहीत. तर आतापर्यंतच्या मानव समूहाने केलेल्या प्रयत्नांचे ते फलित आहे. ही सर्व व्यवस्था कोणा एकाच्या बळावर उभी नाही. प्रत्येक माणसाचा या व्यवस्थेला हातभार लागतो. रस्त्यावर झाडू मारणाऱ्या व्यक्तीपासून ते राष्ट्रपतीपर्यंत प्रत्येकाची समाजाला गरज आहे. म्हणजेच आपलं जगणं हे फक्त आपल्यासाठी नाही. ते नकळत संपूर्ण जगाशी जोडलेलं आहे.
३. भले हा जगाचा पसारा कितीही मोठा असो, आणि आपण त्यात कितीही क्षुद्र असू किंवा लहान असू, आपल्याला जे वाटत ते आपल्यासाठी खरंच असतं ना? आपला अनुभव आपल्यासाठी सच्चाच असतो. आपण संपूर्ण वेळ आपल्या भावनांकडे तटस्थपणाने पाहू शकत नाही. आपल्याला जे लहानस आयुष्य मिळालं आहे त्याचा सदुपयोग करून काहीतरी विशेष करावं ही उर्मी प्रत्येकात असते. आपल्याला या विश्वनिर्मितीचा उद्देश माहित नसू दे, कदाचित आपला जन्म तो उद्देश समजण्यासाठी नाहीच आहे. आपला जन्म कदाचित वेगवेगळे अनुभव घेऊन या जगाच्या प्रचंड मंचावर एखाद लहानस पात्र रंगवण्यापुरताच आहे.
४. समजा मृत्यू येणार म्हणून जगण्याची धडपड थांबवली तर आपण काय करणार ? एका जागी बसून मृत्यूची वाट बघणार ? तो आपल्याला मिळालेल्या आयुष्यरूपी वरदानाचा अपमान नाही काय? जगात अनेक लोक आहेत जे या क्षणी जगण्यासाठी प्रयत्न करत आहे. एक श्वास आणखी घेता यावा म्हणून तळमळत आहेत. मृत्यूशी झुंज देत आहेत. आणि आपण जगण्यासाठीची धडपड थांबवायची? कशासाठी? हा पळपुटेपणा नाही का? कि हा भयंकर आळसाचा विपर्यास आहे?
मृत्यू नंतर स्वर्ग असेल वा नसेल, पुनर्जन्म असेल किंवा नसेल, किंवा कदाचित मृत्यूनंतर काहीच नसेल. मग जे आता जीवन या क्षणी आपल्या हातात आहे त्याला सुंदर बनवण्यासाठी आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी माणसाने कष्ट का घेऊ नयेत?
विचार करा अथवा करू नका, मृत्यू अटळ आहे. मग जे अटळ आहे त्याचा विचार बाजूला ठेवून मिळालेल्या जीवनाचा आनंद का घेऊ नये?
पाडगावकर म्हणतात :
आयुष्य ही बासरी असते
जवळ घेता आली पाहिजे ;
आपलेच ओठ, आपलेच श्वास
सुरात लावता आली पाहिजे …

मग आयुष्य ही धडपड राहणार नाही. त्याच सुरेल असं गाणं होईल. आणि मग –
येणार असेल मरण तेव्हा
येऊ द्यावं ,
जमलंच तर लाडाने
जवळ घ्यावं !
मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबत का ?
जीव जडून प्रेम करायचं थांबत का ?