असा एकही दिवस जात नाही कि मी पुलंची एखादीतरी ओळ माझ्या डोक्यात चमकून जात नाही. पुलंची जवळपास सगळी पुस्तक मी वाचली आहेत. आणि पुन्हा पुन्हा वाचली आहेत. पुलंचा सखाराम गटणे म्हणतो, “आपण आणि साने गुरुजी माझे आदर्श लेखक आहात.” पुलंची आणि माझी भेट झाली नाही. नाहीतर कदाचित हे वाक्य मीच म्हटलं असत. सानेगुरुजींनी मला नैतिकता शिकवली, संवेदनशीलता शिकवली. आणि पुलंनी यातला मझा शिकवला. जगण्यातला आनंद शिकवला. आयुष्यातील खडतर प्रसंगी सुद्धा मला हसण्याचं धैर्य दिलं.
पुलंच्या लिखाणातून मला आणखी काय मिळालं?
अज्ञान प्रकट करायला कधीही लाजू नये हे शिकवलं. आणि आपल्याला एखाद्या गोष्टीतील काही कळत नसेल तरी त्यातलं आपल्याला कळत हे दाखवण्याचा अट्टहास करू नये हे कळलं. पुलं एकदा म्हणाले होते, “आजकाल साहित्यिकाला चित्रकलेतलं आणि चित्रकाराला साहित्यातलं आणि दोघांनाही संगीतातलं कळणं आवश्यक होऊन बसलं आहे.” आपल्या चित्रकलेतील अज्ञानाची खिल्ली उडवताना पुलं कधी लाजले नाहीत. संगीतातील दिग्गजांना – मग ते वयाने लहान असले तरी – मानाचा मुजरा करायला घाबरले नाहीत. आणि ते ही स्वतः यशस्वी संगीतकार असूनसुद्धा!
कवितेची आवड मला पुलंच्या पुस्तकांमधून लागली. त्यांनी केलेली अनेक कवितांची परीक्षणं मी वाचली. त्यांच्या लिखाणातून सतत कवितांचे संदर्भ येत आणि त्यामुळे त्यांच लिखाण अजून वाचनीय होत असे. त्यांच्या पुस्तकांमधून कविता किती सुंदर असते ते कळलं आणि आणखीन वाचण्याचा ध्यास जडला.

लोकसाहित्याची पुलंना जबरदस्त ओढ होती. तमाशा , भारूड, गोंधळ या सारखे लोककलाआविष्कार त्यांना तुच्छ वाटत नव्हते. माणूस, मग तो शिकलेला असो व अशिक्षित , जर तो सच्चा कलाकार असेल तर पुलंनी त्यांची तारीफ करताना शब्द हातचे राखून ठेवले नाहीत. जीवनाकडे, कलेकडे एका ठराविक साच्यातून पाहण्याची क्षुद्र वृत्ती पुलंमध्ये अजिबातच नव्हती.

पुलं असंख्य माणसांना भेटले. माणसांची प्रचंड आवड होती त्यांना. त्यात सगळेच साधुसंत नव्हते. पण व्यक्तीच्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून सद्गुणांना पाहण्याची निर्मळ दृष्टी पुलंना लाभली होती. एखाद्या व्यक्तीच्या भाषेवरून, पेहरावावरून त्याची लायकी पुलंनी कधीच ठरवली नाही. समाजातील सर्व प्रकारच्या माणसांसाठी त्यांनी आपल्या मनाची कवाड सताड उघडी ठेवली. त्यांच्या मित्रमेळात शिव्या हासडणाऱ्या रावसाहेबांपासून ते सोज्ज्वळ हिराबाई बडोदेकरांपर्यंत असंख्य माणसं होती.
पुलंमुळे भारतीय संगीत किती समृद्ध आहे हे कळलं. त्या संगीताच्या थोड्याफार मर्यादाही कळल्या. आपलं तेच श्रेष्ठ , असा हेकेखोरपणा मनात निर्माण होऊ दिला नाही. अनेक मोठ्या माणसंच मोठेपण पुलंच्या व्यक्तिचित्रणातून कळलं. अनेक पुस्तकांशी तोंडओळख पुलंच्या पुस्तकांमधून झाली.
त्यांच्या लिखाणाने शिकवलं , कठीणात कठीण परिस्थिती मध्ये सुद्धा हसता येत. आपल्या फजितीवर आपलं आपणही हसता येत. जेव्हा जेव्हा मला खूप एकटं वाटत, खूप उदास वाटतं तेव्हा पुलंच्या पुस्तकांची सोबत असते.

मी ह्या उत्तरासाठी सहज म्हणून काही पुलंची पुस्तक पुन्हा एकदा चाळली . त्यातील काही वाक्य खाली देत आहे. आशा आहे कि ती वाचून तुम्हालाही पुलंची पुस्तकं वाचण्याचा मोह टाळता येणार नाही.
1. दारिद्र्य हसण्याला फार भिते (स्रोत : गणगोत – पु ल देशपांडे )

2. इतिहासातून राष्ट्राचे शील शोधायचे असते, लढायांचा आणि तहांचा तपशील नव्हे. (स्रोत : गणगोत – पु ल देशपांडे )
3. सूर आणि लय यांच्यावरच प्रेम केल्यामुळे कुठल्याही एका गायकाच्या किंवा गायिकेच्या मैफिलीतला शराबी किंवा नमाझी होऊन मी कधीच राहिलो नाही. मनाचे भिक्षापात्र मोकळे घेऊन मी गाण्यांच्या मैफिलीत जातो. (…) सूर संगतीत आधीव्याधींचा विसर पाडणारे कलाकार मला काल भेटले, आज भेटताहेत, उद्याही भेटतील. सच्चा सूर कुठल्याही काळात लागला तरी सच्चाच ! (स्रोत : गुण गाईन आवडी – पु ल देशपांडे )

4. मी बारीक सुपारी कातरली आणि विचारले “तंबाखू किती टाकू?” “बस्स चिमूटभर! बदनामीपुरता!” बदनामीला चिमूट पुरते! (स्रोत : गुण गाईन आवडी – पु ल देशपांडे )
5. एकदा आसवांबरोबर भाकर भिजवून खाल्ली कि पावाबरोबरच्या लोण्याचे कौतुक संपते.(स्रोत : गणगोत – पु ल देशपांडे )
6. मला भवानीचे कौतुक शिवरायांमुळे आणि विठ्ठलाचा मोठेपणा ग्यानबा-तुकारामांमुळे (स्रोत : गणगोत – पु ल देशपांडे )
7. नट हा त्या कलेची ओढ वगळली तर इतर माणसांसारखा माणूसच असतो. कौतुकाने फुलणारा, पराभवाने खचणारा, देहाच्या इतर साऱ्या आणि पछाडलेला सामान्य माणूस. परंतु समाजात मात्र तो एक किंवा अनेक प्रतिमा घेऊन जगात असतो. रुपजीवी. त्या मुखवट्या आडचा माणूस लोकांना दिसायलाही नको असतो. जीवनात ज्यांना गर्दीसमोर जगावे लागते त्यांच्याबाबतीत प्रतिमा होऊन जगण्याची भयंकर पीडा असते. ती प्रतिमा अभंगच राहिली पाहिजे अशी पाहणाऱ्यांची इच्छा असते. – नव्हे , दुष्ट असा हट्ट हि असतो. (स्रोत : गुण गाईन आवडी – पु ल देशपांडे )
8. चूल पेटती ठेवण्यासाठीची धडपड कुणालाच चुकली नाही. परंतु सारे जीवनच त्या धडपडीसाठी आहे हे मानून चालणे म्हणजे केवळ अभागीपणाचे लक्षण आहे. (स्रोत : गुण गाईन आवडी – पु ल देशपांडे )
9. साहित्य काय संगीत काय, आयुष्याच्या अखेरीला हेच सांगते कि, “सितारों के आगे जहाँ और भी है” तुला दिसलेल्या तारामंडळांच्या पलीकडे तारामंडळे आणखी हि आहेत. (स्रोत : गाठोडे – पु ल देशपांडे )

10. ज्यांना सुरलयीचा आनंद घेता आला ते “आम्ही फक्त शास्त्रीय संगीतच ऐकतो” असं चुकूनही म्हणणार नाहीत. (स्रोत : गुण गाईन आवडी – पु ल देशपांडे )
11. कानी सूर नाही किंवा हाती पुस्तक धरलं नाही असे माझ्या आयुष्य फार म्हणजे फारच थोडे दिवस गेले असतील. माझ्या बाबतीत जीवन हा शब्द पुस्तकाचा अंतर्भाव न करता मला वापरताच येणार नाही. (…) मी कधी वाचनाची नोंद ठेवली नाही. कारण अमुक इतकी पुस्तक मी वाचली असं मला कुणालाच सांगायचं नव्हतं. शाळा- कॉलेजातील सक्तीची पुस्तक सोडली तर मी व्यासंग वाढवावा किंवा अभ्यास करावा म्हणूनही शिस्तबद्ध वाचन केलं नाही. ज्या हौसेने मी गाण्याच्या मैफिलीत जाऊन बसतो, त्याच हौसेने मी नवीन पुस्तक उघडतो. (स्रोत : दाद – पु ल देशपांडे )
12. जीवनातले असंख्य प्रकारचे अनुभव शोषून घेऊन त्यांना विविध आकार देऊन , त्यातली आशयघनता आणि रंगवैचित्र्य हे दाखवत साहित्य जेव्हा पुन्हा जनमानसावर वर्षाव करत त्याच वेळी ते कृतार्थ होत असं मला वाटत. (स्रोत : दाद – पु ल देशपांडे )
13. दलित कवितेबद्दल पुलं म्हणतात : “विद्रोहाच्या कवितेत एकसुरीपणा जाणवतो हे संपूर्णपणे खोटे नव्हे. पण ज्यांच्या जीवनात दुसरा कुठला सूर येतच नाही – नव्हे युगानुयुगे येऊच दिला नाही त्यांनी कुठली गाणी गावी ? की आजन्म लादलेल्या दारिद्र्याच्या आणि उपेक्षेच्या सुटकताही सक्तीच्या साहित्यिक दिवाळ्या साजऱ्या कराव्या ?” (स्रोत : दाद – पु ल देशपांडे )
14. देवाची आराधना करून एका माणसाने मोक्ष किंवा स्वर्ग मिळवण्याला काही अर्थ नाही. त्यातून देवाचेही मोठेपण सिद्ध होत नाही किंवा त्या माणसांचेही नाही. परंतु सार्वजनिक सुखासाठी प्रयत्न होतो त्या वेळी त्या आराधनेला किंमत असते. गावची जत्रा जशी साऱ्या गावाला सुख देऊन जाते तशी गावाची विहित सर्वाना पाणी देऊन गेली पाहिजे. रयतेच्या पोरांना मुन्शिपालिटीची काळोखी शाळा आणि व्यक्तिगत श्रीमंतीच्या बळावर दोघाचौघांच्या पोरांसाठी अद्ययावत ज्ञानसाधनांनी युक्त अशी विद्यालये ही समाजाला सार्वजनिक बौद्धिक श्रीमंती न देता पुन्हा एकदा सत्तेच्या नव्या सोयी करून देणारा नवा ब्राह्मणच तयार करतील. एकाच लोकशाहीत पुन्हा एकदा बडे लोक आणि छोटे लोक असे घटक तयार होतील. (स्रोत : दाद – पु ल देशपांडे )
15. महाराष्ट्राच्या राजाच्या गळ्यात कवड्याची माळ असे म्हणतात. ती माळ मला फार सूचक वाटते. लोकांचा राजा म्हणून ज्याला जगायचे असते त्याने स्वतःचे जीवन कवडीमोल मानायची तयारी ठेवावी लागते. (स्रोत : दाद – पु ल देशपांडे )
16. जगात कुणी कुणाला दुःख का द्यावं ह्या प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नांच्या मागे लागू नये. कारण हे सार काय आहे, कशासाठी आहे याच उत्तर कुणालाही सापडलेलं नाही. हे आहे हे असं आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे. नाहीतरी फुल म्हणजे काय असत? काही स्त्रीकेसर, काही पुंकेसर – मऊमऊ तुकड्यांचा एक पुंजका एवढाच ना? पण आपण त्याला अर्थ दिला. कुणी ते देवाला दिलं. कुणी प्रेयसीला दिलं. कुणी स्वतःच्या कोटला लावल आणि फुलाला अर्थ आणला. जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो. तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो. जीवनाला आपण काहीतरी द्यावं लागत. अगदी निरपेक्ष बुद्धीने द्यावं लागत. आणि मग जीवनाला अर्थ येतो. नदीत दीपदान करतात तशी हवेवर विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका मी आज आकाशवाणीवर सोडली. कुणाला आवडेल, कुणाला नावडेल. कुणी माना डोलावतील. कुणी नाके मुरडतील. मला त्याच दुःख किंवा आनंद होता काम नये. दुःख झालं पाहिजे, तो ते देताना झालेल्या आपल्या चुकांचं , अपूर्णत्वाच्या जाणिवेचं ! आनंद झाला पाहिजे तो ते करताना झालेल्या तन्मयतेचा. बस्स! एवढच करण्यासाठी आपण इथे आलो आहोत. तुकोबा म्हणतात, “याचिसाठी केला होता अट्टाहास – शेवटचा दिस गोड व्हावा!” मी म्हणतो रोजचा दिस गोड व्हावा हा अट्टहास हवा. कारण रोजच्यातला कोणता दिस शेवटचा आहे हे आधी कुणाला कळलं आहे? आपण जीवनाचा मळा शिंपावा. उगवला तर उगवला. बोझा टाकायचाच आहे तर आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या पायाखाली विझवाव्या. वैताग, कंटाळा मलाही येतो. क्षुद्रपणा जाणवतो. स्वार्थ दिसतो. पण तसा आपल्यातही कुणाला आढळणार नाही ना, याची चिंता असावी. म्हणजे मग जगण्याला धार येते. फिलॉसॉफर वाचण्याऐवजी ललित लेखक वाच. दोस्तोव्हस्की, डिकन्स, गॉर्की, शेक्सपीअर वाच. जीवनाला रंग देणारी ही माणसं. तत्त्वज्ञ आणि माझं सूत कधीच जुळलं नाही. शून्याला भागात बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापेक्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग. जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीचच झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल. (…) ज्या दिवशी जन्माला येण Justifiable होईल त्या दिवशी आपण मरणाचं justification शोधात बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोन करायचं आहे. (स्रोत : गाठोडं – पु ल देशपांडे )