अभिसारिका

रात उतरली मुग्ध चांदणी
आतुर झाली व्याकुळ सजणी.
नथ बिलोरी सजली नाकी
साडी ल्यायली गर्भरेशमी
डोळ्यामध्ये काजळ भरले
विरहाचे का दुःख लपवले?
संकेताची ठरली जागा
भेटायाचा साजण माझा
तशी निघाली अंधारात
होती जरी ती उत्तररात
कोण बरे ही व्यभिचारिणी?
अभिसारिका खुळी दिवाणी?
ही कसली प्रेमाची गोडी ?
लज्जेची मर्यादा तोडी?
झाडे लागती वाऱ्याच्या कानी
‘शोध बरे तू हिची कहाणी’
अवखळ वारा गेला मागे
उगा तिच्या अंगाला झोंबे
गावाच्या एका चौकात
ललना थांबे जोडून हात
डोळ्यांमधले पाणी रोखून
चाफ्याची अन ओंजळ अर्पून
जमिनीवरती माथा टेकून
अस्पष्ट काही ती गेली बोलून
“लोक सारे विसरून गेले
त्यांच्यासाठी कोणी मेले…
स्वातंत्र्याच्यासाठी माझ्या
राजाचे अन रक्त सांडले…
मंदिराहून ही पवित्र जागा
इथे विसावे साजण माझा…
शेवटचे मज कुशीत घे ना
तुझ्या सोबती मजला ने ना..”
डोळ्यांचे अन बांधच फुटले
धीराचे डोंगर कोसळले
हेलावूनी मग गेला वारा
विरघळल्या आकाशातील तारा
प्रेमाची ही दिव्य प्रचिती
मृत्यूलाही हरवे प्रीती

-मधुराणी