प्रत्येकाच्या आत असते एक गोष्ट दडलेली

प्रत्येकाच्या आत असते एक गोष्ट दडलेली

खरीखुरी एक कहाणी त्याच्यासोबत घडलेली !

शाळेच्या त्या रस्त्यावरती

किलबिललेले काही बोल

एवढुश्या त्या मनामध्ये

गुपिते बाई किती खोल

गळा शप्पथ देऊनच मग

कानामध्ये कुजबुजलेली

प्रत्येकाच्या आत असते एक गोष्ट दडलेली !

काही असती उनाड वेळा

गप्पांमध्ये रंगलेल्या

बिअर, व्हिस्की वा रम सोबत

आनंदाने झिंगलेल्या

हवीहवीशी वाटत असते

हळुवार नशा चढलेली

प्रत्येकाच्या आत असते एक गोष्ट दडलेली !

हिरवागर्द एक रस्ता

तिच्यासोबत सरलेला

कधीतरी एक गोड हात

हातामध्ये धरलेला

आणि एक घट्ट मिठी

मनामध्ये कोरलेली

प्रत्येकाच्या आत असते एक गोष्ट दडलेली !

कोसळणारा चिंब पाऊस

दारामध्ये थांबलेला

हळवा उदास ओला क्षण

कुशीत शिरून रडलेला

आणि असते एक उशी

आठवणींनी भिजलेली

प्रत्येकाच्या आत असते एक गोष्ट दडलेली!

सुरकुतलेला एक हात

चेहऱ्यावरून फिरलेला

कौतुकाने मायेने अन

आशीर्वादाने भरलेला

आभाळाचे रंग लेवून

एक संध्या नटलेली

पुढे गेल्या साथीच्या

छायेमध्ये रमलेली

प्रत्येकाच्या आत असते एक गोष्ट दडलेली !

नशिबी असती काही नकार

खोलवर खुपलेले

स्वप्नांचे ते लखलख झुंबर

खळ्ळकन तुटलेले

तरी असते दुर्दम्य आशा

डोळ्यांमध्ये रुजलेली

प्रत्येकाच्या आत असते एक गोष्ट दडलेली !

– मधुराणी